बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi) मुन्नाभाई एमबीबीएस, जॉली एलएलबी, गोलमाल अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतंच अर्शद वारसीने बॉलिवूडमधील 'यस मॅन' संस्कृतीवर भाष्य केलं आहे. एखाद्या चित्रपटाबद्दल तुमचं मत कितीही प्रामाणिक असलं तरी तुम्ही ते मांडू शकत नाही अशी खंत अर्शद वारसीने मांडली आहे. यावेळी त्याने एक जुना किस्सा सांगितला. अर्शद वारसीने चित्रपटाबद्दल जे वाटत होतं ते सांगितल्यानंतर जया बच्चन त्याच्यावर फार संतापल्या होत्या.
अर्शद वारसीने समदीश भाटियाच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने आपल्याला एकदा जया बच्चन यांनी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी निमंत्रण दिल्याची आठवण सांगत तो किस्सा सांगितला. "एकदा जयाजी यांनी मला चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी बोलावलं. ते लोकांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांना बोलावत असत. त्यांनी मला स्क्रिनिंगनंतर चित्रपट कसा वाटला असं विचारलं. त्यावर मी 'फारच बकवास' असं उत्तर दिलं. यानंतर त्यांनी मला एका कोपऱ्यात नेलं आणि 'तुझं मत तुझ्यापुरतं मर्यादित ठेव' असं सांगितलं. तुम्हाला या गोष्टींमधून धडा मिळत असतो.
बॉलिवूडमध्ये तुम्हाला नेहमी प्रत्येक गोष्टीला हो बोलावं लागतं असं सांगताना अर्शद म्हणाला की, "तुम्ही येथे तुमचं प्रामाणिक मत मांडूच शकत नाही. तुम्हाला सत्य बोलण्याची परवानगी नाही. मग तो चित्रपट कितीही वाईट असला तरी फरक पडत नाही".
अर्शदने 1996 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रोडक्शन हाऊसखाली निर्मिती झालेल्या 'तेरे मेरे सपने' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्याला हैदराबादला जावं लागलं होतं. विमानात प्रवासादरम्यान त्याने 'चड्डी बनियान' घातली होती. यामुळे जया बच्चन चिडल्या होत्या ज्यांनी नंतर त्यांना योग्य प्रकारे कपडे घालण्यास सांगणारा संदेश पाठवला.
ही आठवण सांगताना अर्शद म्हणाला की, “मी चित्रपटसृष्टीत नवीन होतो आणि माझे ज्ञान शून्य होतं. मी वेगळ्या जागेवरुन आलो आहे. 'तेरे मेरे सपने' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्हाला हैदराबादला जावे लागले. मी चड्डी आणि बनियान घालून फ्लाइटमध्ये बसलो. आम्ही डान्सर असल्याने पूर्वी असे कपडे घालायचो. जेव्हा जयाजींना हे कळले तेव्हा त्यांनी मला संदेश पाठवला. कृपया अर्शद वारसीला प्रवास करताना योग्य कपडे घालण्यास सांगा".
आधीच्या एका मुलाखतीत अर्शद वारसीने जया बच्चन 'तेरे मेरे सपने' चित्रपटात आपल्याला कास्ट करण्यासाठी कशाप्रकारे तयार झाल्या याची माहिती दिली होती. आपणही त्यांना हेच विचारलं होतं असं अर्शद म्हणाला. त्यावर जया बच्चन यांनी सांगितलं होतं की, कास्टिंग कॉलदरम्यान तू पाठवलेल्या 36 फोटोत वेगवेगळे भाव होते त्यामुळेच तुला कास्ट केलं. अर्शद वारसी 'बच्चन पांडे' चित्रपटात अखेरचा दिसला होता. यामध्ये अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉनही होते. आता तो जॉली एलएलबी 3 मध्ये दिसणार आहे.