अर्जुन, संजुबाबाच्या 'पानिपत'चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी परत मागितले पैसे

असं का....? नेटकऱ्यांचा सवाल 

Updated: Nov 6, 2019, 08:02 AM IST
अर्जुन, संजुबाबाच्या 'पानिपत'चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी परत मागितले पैसे  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : एखाद्या ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट साकारला जाण्याची माहिती समोर आली, की प्रेक्षकांमध्ये आपोआपच कुतूहलाची लाट पसरते. असंच कुतूहल अभिनेता अर्जुन कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'पानिपत' या चित्रपटाविषयीसुद्धा पाहायला मिळालं. आशुतोष गोवारिकरच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलेल्या आणि अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेवर भाष्य करणाऱ्या 'पानिपत'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

'सदाशिव राव भाऊ', 'अहमद शाह अब्दली', 'पार्वती बाई' या मध्यवर्ती पात्रांसोबतच मराठा साम्राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि पात्रांची जोड घेत चित्रपटाची एक झलक या ट्रेलरच्या माध्यमातून पाहता आली. पण, जवळपास साडेतीन मिनिटांचा हा ट्रेलर नेटकऱ्यांना आणि प्रेक्षकांना मात्र काहीसा रुचला नाही. मुळात पानिपतच्या युद्धाची कथा अनेकांच्या वाचनात आहे. त्यामुळे ही पात्र प्रत्यक्षात पाहिली नसली तरीही त्यांची एक प्रतिमा प्रत्येकाच्याच मनात तयार झाली आहे. याच प्रतिमेच्या शोधात प्रेक्षक निघाले पण, ट्रेलरने मात्र आपली निराशा केल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 

अनेकांनीच 'सदाशिव राव भाऊं'च्या व्यक्तीरेखेसाठी अर्जुनची निवडच पटली नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्याच्या वाट्याला आलेली ही भूमिका पाहून काहींनी तर, आमचे ट्रेलर पाहण्याचे पैसे परत द्या, असाही सूर आळवला. तर, काहींनी 'पद्मावत', 'अग्निपथ' आणि  'बाजीराव मस्तानी' या चित्रपटांचून थोडाथोडा भाग घेत पानिपत साकारल्याची उपरोधिक टीकाही केली. 

फक्त अर्जुन कपूरच नव्हे, तर अभिनेता संजय दत्त यानेही साकारलेला 'अहमद शाह अब्दाली' प्रेक्षकांची मनं जिंकत असला तरीही त्यातसुद्धा फार प्रभावी असा घटक सापडलाच नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. 

एकंदरच पानिपतच्या ट्रेलरने अपेक्षाभंग केला, असं म्हणणाऱ्या या चाहत्यांना आता अपेक्षा आहे ती म्हणजे चित्रपटाच्या दिग्दर्शनातील अविष्काराची. ज्यावरुन आता ६ डिसेंबरलाच पडदा उचलला जाणार आहे.