मुंबई : बी टाऊनचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टही तितक्याच लक्षवेधी असतात. अशातच सध्या तिनं पोस्ट केलेला एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधताना दिसत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्य़ात आलेल्य़ा या व्हिडिओमध्ये इरा तिच्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसत आहे. आपण नेमकं नैराश्य़ाच्या परिस्थितीला सामोरं का गेलो, याबाबतही तिनं खुलासा केला.
नैराश्याबाबत इरा म्हणाली...
आमिरची मुलगी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली, 'अनेकांनीच मला तू नैराश्यग्रस्त का आहेस, याबाबत मला विचारलं. या प्रश्नाचं उत्तर मी स्वत:सुद्धा देऊ शकणार नाही, कारण मलाच ते ठाऊक नाही. मागील कित्येक वर्षांपासून मी हे समजून घेण्याच्या प्रयत्नांत आहे पण याचं कोणतंच सरळ सोपं उत्तर नाही'.
आपल्याला पैशांच्या बाबतीत कधीच अडचण आली नाही. आई- वडिलांच्या रुपात आपल्याला कामच आधार मिळाल्य़ाचंही तिनं सांगितलं.
'मी स्वत:ची काळजी घेणंच बंद केलं होतं. फार झोपत होते. आयुष्य जगायचंच नाही, या विचारानं मी त्या वेळात झोपत असे. पूर्वी मी फार व्यग्र असायचे. पण, हळूहळू अंथरुणातून मी बाहेरट पडत नव्हते', असं सांगत आपण प्रमाणाबाहेर हळवं होऊन वारंवार रडत असायचो असं तिनं या व्हिड़िओमध्ये सांगितलं.
आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत म्हणाली....
सहसा आईवडिलांच्या नात्यात आलेला दुरावा हा मुलांवर थेट परिणाम करणारा ठरतो. याबाबबत मोठा खुलासा करत आपल्यावर या साऱ्याचा फार परिणाम झाला नसल्याचं तिनं सांगितलं. 'मी लहान असतानाच आई- वडिलांचा घटस्फोट झाला होता. पण, त्यामुळं मला धक्का पोहोचला वगैरे असं काही झालं नाही. ते अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कुटुबं विखुरलेलं नाही', असं इरा म्हणाली.
आपल्याला टीबी आजार झाल्याचं सांगण्य़ापासून, वयाच्या १४ व्या वर्षी लैंगिक शोषणाचा शिकार होणं इथपर्यंत इतरही बऱ्याच मुद्दयांवर इरा बोलली, तिनं धक्कादायक गौप्यस्फोट केले. तिचं बोलणं अनेकांनीच उचलून धरलं. मुळात खासगी आयुष्याबाबत इतक्या खुलेपणानं बोलणाऱ्या इराची काही नेटकऱ्यांनी पाठही थोपटली.