नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा आज वाढदिवस असून तिने वयाची ३२ वर्ष पूर्ण केली. राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ मध्ये पुण्यात झाला. तिने हिंदी सोडून बंगाली, मराठी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे.
२०११ मध्ये 'शोर इन दि सिटी' चित्रपटातून नावारुपाला आलेल्या राधिकाने यापूर्वी 'दि वेटिंग रूम', 'रक्त चरित्र 1', 'रक्त चरित्र 2', 'आई एम' यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या.
६ वेगवेगळ्या भाषांमध्ये ३० पेक्षा अधिक चित्रपट केल्यानंतर २०१५ मध्ये 'बदलापुर' चिरपटातून तिला हिरोईन म्हणून ओळख मिळाली.
आजकाल चित्रपट व्यवसायात महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्याचबरोबर महिलांवर आधारित चित्रपटांची संख्या वाढली आहे.
'मॉम', 'पार्च्ड' आणि 'पिंक' यांसारखे महिलांवर आधारित चित्रपटांची संख्या का वाढत आहे ? या प्रश्नाचे उत्तर देताना आयएएनएसशी बोलताना राधिका म्हणाली, "यापूर्वी देखील महिलांवर आधारित चित्रपटासाठी अनेक विषय होते. परंतु, चित्रपट व्यवसायात लेखक आणि दिग्दर्शन क्षेत्रात महिला काम करायला लागल्यापासून महिलांवर आधारित चित्रपटांची संख्या वाढली आहे."
'पार्च्ड', 'फोबिया' यांसारख्या चित्रपटात सशक्त भूमिका केलेल्या अभिनेत्रीला आव्हानं आवडतात. आव्हानांशिवाय जीवन जगण्यात काही अर्थ नाही, अशी तिची धारणा आहे.