मुंबई : छोट्या पडद्यावरील 'भाभी जी घर पर हैं' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता दीपेश भानचे निधन झाले आहे. शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना तो अचानक खाली पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
'भाभीजी घर पर हैं' या मालिकेत दीपेशने मलखान सिंगची भूमिका साकारली होती. शोचे सहाय्यक दिग्दर्शक यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच मालिकेत असलेला अभिनेता वैभव माथूरनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. वैभव म्हणाला, "हो, तो आता आपल्यासोबत नाही. मला यावर काहीही बोलायचं नाही, कारण सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही."
दिल्लीतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथे अभिनयाचा शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये दीपेश मुंबईत आला. शोमध्ये मुलींसोबत फ्लर्ट करणाऱ्या दीपेश भानचं खरं तर लग्न झालं होतं. त्यांचं 2019 मध्ये दिल्लीत लग्न झालं होतं. जानेवारी 2021 मध्ये दिपेशच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला.
गेल्या वर्षीच अभिनेत्याच्या आईचं निधन झालं आणि आता त्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. 'भाबीजी घर पर हैं'ने दीपेश भानला खूप प्रसिद्धी दिली. टिल्ल, टिका आणि मलखान हे त्रिकूट जेव्हाही शोमध्ये यायचे तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणायचे.
या शोपूर्वी, दीपेशनं 'कॉमेडी का किंग कौन', 'कॉमेडी क्लब', 'भूतवाला', 'एफआयआर' सोबत 'चॅम्प' आणि 'सुन यार चिल मार' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये दिपेशनं 'फालतू उटपटांग चटपटी कहानी' या चित्रपटातही काम केलं होतं. यासोबतच तो आमिर खानसोबत टी-20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीतही दिसला होता.