केसांच्या सँपलमुळे धक्कादायक खुलासा, अभिनेत्रींनी घेतलेले ड्रग्ज; दोन मोठी नावं अडचणीत

मागील वर्षी या दोन्ही अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आलं होतं.

Updated: Aug 24, 2021, 05:40 PM IST
केसांच्या सँपलमुळे धक्कादायक खुलासा, अभिनेत्रींनी घेतलेले ड्रग्ज; दोन मोठी नावं अडचणीत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोन अभिनेत्रींच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Bengaluru Drug case) बंगळुरू ड्रग्ज केस प्रकरणी विविधभाषी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री संजना गलरानी आणि अभिनेत्री रागिनी द्वीवेदी यांच्याभोवती असणारा संकटांचा फास आणखी घट्ट झाला आहे. 

मागील वर्षी या दोन्ही अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर ड्रग्ज विश्वाशी चित्रपट वर्तुळाचं नातं धक्कादायकरित्या समोर आलं. अटकेनंतर या दोन्ही अभिनेत्रींची सुटका जामिनावर करण्यात आली होती. पण, आता मात्र फॉरेंसिक लॅब रिपोर्टमुळं त्यांच्या अडचणी दुपटीनं वाढल्या आहेत. FSL Report एफएसएल अहवालानुसार या दोन्ही अभिनेत्रींनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं कळत आहे. 

केसांमुळे समोर आली ही बाब
सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे की, संजना आणि रागिनी या दोघींनीही ड्रग्जचं सेवन केलं होतं. सध्या या अभिनेत्री जामिनावर मोकळ्या आहेत. यांच्या चाचणीसाठी केसांचे नमुने घेण्यात आल्याचं कळत आहे. सदर प्रकरणी इवेंट मॅनेजर वीरेन खन्ना, आणि अभिनेता विवेक ओबेरॉयचा जवळचा नातेवाईक आदित्य अल्वा यालाही अटक करण्यात आली आहे. 

सीसीबीच्या हाती तपास 
ड्रग्ज प्रकरणी सिटी क्राईम ब्रांच अर्थात सीसीबी तपास करत आहे. नशा येणाऱ्या औषधांचं सेवन केल्या प्रकरणी सीसीबीनं संजना आणि रागिनीच्या केसांचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या चाचणीला हेयर फॉलिकल टेस्ट नावे ओळखलं जातं. चाचणीसाठी पाठवण्यात आलेले केसांचे सँपलं सर्वप्रथम नाकारण्यात आले होते. पण, यानंतर चाचण्यांच्या आणि अहवालांचा वेग वाढवण्यासाठी नऊ महिन्यांपूर्वी नखं आणि लघुशंकेचेसोबत केसांचेही नमुने घेण्यात आले होते. असं म्हटलं जातं की, केसांमध्ये नशेचा अंश असणाऱ्या औषधांचं प्रमाण एका वर्षापर्यंत शोधता येतं.