मुंबई : मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. जातीयवाद, मशीदींवरील भोंगे आणि किळसवाणं राजकारण या साऱ्यामुळं सर्वसामान्य जनता वैतागली आहे. देशात इतर महत्त्वाचे मुद्दे असताना या मंडळींना त्याकडे दुर्लक्ष करणं कसं जमतं हा प्रश्न अनुत्तरितच.
असो, पण असेच महत्त्वाचे मुद्दे चित्रपटांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहेत. अशाच एका प्रकरणावर 'अनेक' या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. 'मुल्क', 'आर्टिकल 15' आणि 'थप्पड़' यांसारख्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आणखी एका मागे पडलेल्या मुद्द्याला प्रकाशात आणलं आहे. (Anek Movie trailer)
पूर्वोत्तर भारतात असणारी परिस्थिती, स्थानिक फुटीरतावादी संघटना आणि त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं धगधगतं आयुष्य या साऱ्यावर 'अनेक' (Anek) चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
भारतातच राहून भारतीय असल्याचं ज्या मंडळींना नागरिकत्त्वं सिद्ध करावं लागतं त्यांची शोकांतिका चित्रपटातून मांडण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, आयुष्मान त्यामध्ये अंडरकव्हर एजंटच्या रुपात दिसत आहे.
आयुष्मान खुराना आणि एंड्रिया केविचुसा यांच्या मुख्य भूमिका असणारा आणि कोरोना काळात चित्रीकरण पूर्ण झालेला हा चित्रपट 27 मे 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आतापर्यंत सातत्यानं आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या आयुष्मान खुराना याच्या कारकिर्दीत हा चित्रपट मैलाचा दगड ठरू शकतो, तेव्हा आता त्याला प्रेक्षकपसंती किती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.