'सेक्रेड गेम्स ३'च्या नावाखाली कलाकारांची फसवणूक

'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीजनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खानने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले होते.

Updated: Jun 12, 2019, 10:56 AM IST
'सेक्रेड गेम्स ३'च्या नावाखाली कलाकारांची फसवणूक  title=

मुंबई : 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारी विश्वाच्या थरारारावर आधारलेल्या 'सेक्रेड गेम्स २' च्या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'ला चाहत्यांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. लवकरच या सीरिजचे नवे पर्व 'सेक्रेड गेम्स २' रिलीज करण्यात येणार आहे. 

'सेक्रेड गेम्स २' रिलीज होत नाही, तेच तिसऱ्या पर्वाच्या कास्टींगच्या अर्थात कलाकारांची निवड करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिसऱ्या सीजनमध्ये  कोणते कलाकार झळकणार अशा अफवाही सध्या पसरत आहेत. अशातच कास्टींग डिरेक्टर गौतम किशनचंदानी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. 

प्रसिद्ध कास्टींग डिरेक्टर गौतम किशनचंदानी यांनी पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांना केले आहे. 'पसरवण्यात आलेल्या अॅडिशनच्या अफवांपासून सावध राहा. सीरिजमधील प्रत्येक कलाकार माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे. पहिल्या सीजनचा शेवट रहस्यमय झाल्यामुळे दुसऱ्या पर्वाची उत्कंठा चाहत्यांच्या मनात आहे. दुसऱ्या सीजनचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सीरिजही लवकर प्रदर्शित करण्यात येणार आहे.' असे ते म्हणाले.

'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीजनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खानने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले होते. तर 'सेक्रेड गेम्स २' मध्ये सैफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या शिवाय अभिनेता पंकज त्रिपाठीसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. २००६ साली लेखक विक्रम चंद्रा लिखीत एका कादंबरीवर वेब सीरिजची कथा आधारलेली आहे.