मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल १८ जुलै रोजी तिसऱ्यांदा बाबा झाला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रेलियाने एका मुलाला जन्म दिला. अर्जुन-गॅब्रेलियाने त्यांच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बाळाचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या गोंडस मुलाचे नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगीतले आहे. अर्जुन-गॅब्रेलियाच्या बाळाचे नाव अरिक असे आहे.
'खूप चांगली गोष्ट आयुष्यात घडल्यामुळे डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत आहेत. आमच्या जीवनात एका इंद्रधनुष्याचे आगमन झाले आहे. जूनिअर रामपाल आमच्या आयुष्यात तुझे स्वागत' असे भावूक कॅप्शन अर्जुनने त्याच्या बाळाचे फोटो शेअर करत लिहिले आहे.
अर्जुन रामपाल आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मेहर जेसिका यांना दोन मुली आहेत. अर्जुनने १९९८ मध्ये मेहर जेसिकासोबत लग्न केलं होते. मात्र, २८ मे २०१८ मध्ये दोघांनी आपलं २० वर्षांचं नातं तोडत घटस्फोट घेतला.
गेल्या वर्षापासून अर्जुन आणि गर्लफ्रेंड गॅब्रेलिया एकत्र राहत असल्याची चर्चा आहे. आता हे दोघं लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.