बॉलिवूड दबंग सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी निवासस्थानावर गोळीबार करण्यात आल्याने खान कुटुंब सध्या चर्चेत आहे. खान कुटुंब इतकं श्रीमंत असतानाही गॅलॅक्सीमधील अपार्टमेंटमध्ये राहतं. सलमान खान आजही आपल्या आई-वडील आणि भावांसह गॅलॅक्सीमधील छोट्याशा घरात राहणं पसंत करतो. दरम्यान खान कुटुंबात सर्वांचे एकमेकांशी कसे संबंध आहे याचा खुलासा अरबाज खानने केला आहे. आपण घऱात निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय करत असलेल्या चित्रपटांबद्दल बोलतो, तसंच एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दही अपडेट करत असतो असं अरबाज खानने एका मुलाखतीत सांगितलं आहे. पण आम्ही प्रत्येक छोटी मोठी गोष्ट एकमेकाला सांगत नाही असाही खुलासा त्याने केला आहे.
"सलमान खानला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं नाही. तसंच मलाही सलमानच्या आयुष्यात काय सुरु आहे याची प्रत्येक माहिती असली पाहिजे असंही नाही. लोकांना असं वाटतं की आमच्या कुटुंबात प्रत्येकाला दुसऱ्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात काय सुरु आहे याची माहिती असते. पण तसं काही नाही," असं अरबाज खानने सांगितलं आहे.
Bollywood Bubble ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने सांगितलं की, "आमच्यातील प्रत्येकाचं आता खासगी आयुष्य आहे. आम्ही एकत्र राहत असलो तरी सलमानला माझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल सलमानला प्रत्येक गोष्ट माहिती आहे असं नाही. आम्हाला एकमेकाबद्दल सगळंच माहिती असण्याची काही गरज नाही. तो तुमचा भाऊ असला तरी ते त्याचं खासगी आयुष्य आहे. त्याचे व्यावसायिक, आर्थिक निर्णय त्याचे स्वत:चे असायला हवेत".
भाऊ, कुटुंबातही आपण काही सीमा आखणं गरजेचं असल्याचं मत अरबाजने मांडलं आहे. पण आम्ही सीमा आखल्या असल्या तरी एकमेकांच्या पाठीशी उभे असतो असं अरबाजने सांगितलं आहे. "आमच्यापैकी कोणालाही जेव्हा भावनिक, व्यावसायिक किंवा आर्थिक पाठिंब्याची गरज असते आम्ही उपलब्ध असतो. ज्याला त्याक्षणी मदत करणं शक्य आहे तो ती करतो. कारण तेच कुटुंब करतं. पण आम्ही एकमेकांवर एकमेकांना लादत नाही. तो माझा भाऊ आहे, म्हणून आम्ही फार अपेक्षाही ठेवत नाही," असं अरबाज म्हणाला आहे.
जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा त्यात सहभागी प्रत्येकाला त्यातून फायदा होईल याचा प्रयत्न असतो असंही अरबाजने स्पष्ट केलं. मी सलमानसह काम करतो, तेव्हा फक्त माझंच करिअर करत नाही, तर मी त्याच्या करिअरमध्येही काही योगदान देतो असं तो म्हणाला. यावेळी त्याने दबंग चित्रपटाचं उदाहरणही दिलं. दंबग चित्रपटामुळे मला निर्माता म्हणून जसा फायदा झाला, तसा सलमानही झाला असं अरबाजने सांगितलं.