मोगैंबो खुश हुआ... डुडलकडून अमरीश पुरींना मानवंदना

वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि अभिनयाच्या जोरावर अमरीश पुरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. 

Updated: Jun 22, 2019, 07:41 AM IST
मोगैंबो खुश हुआ... डुडलकडून अमरीश पुरींना मानवंदना title=

मुंबई: अत्यंत सृजनशील पद्धतीने जुन्या घटना किंवा व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गुगल डुडल ओळखले जाते. याच गुगलने आज हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांना मानवंदना वाहिली आहे. अमरीश पुरी यांची आज ८७ वी जयंती आहे. यानिमित्ताने गुगलकडून नेहमीच्या कलात्मक शैलीत अमरीश पुरी यांचे डुडल तयार करण्यात आले आहे. गुगलच्या होमपेजवर झळकणारे हे डुडल अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि अभिनयाच्या जोरावर अमरीश पुरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. १९७० ते २००५ या काळात त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटांबरोबरच रंगभूमीवरही मुशाफिरी केली. सत्यदेव दुबे आणि गिरीश कार्नाड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले होते. परंतु, सामान्य प्रेक्षकांच्या मनात अमरीश पुरी यांनी खलनायक म्हणून साकारलेल्या भूमिका अधिक स्मरणात राहिल्या. 

अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी लाहोर येथे झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी लहानसहान भूमिका साकारल्या. १९८० साली आलेल्या हम पाँच या चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले. 

मात्र, अमरीश पुरी यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका हीच त्यांची खरी ओळख ठरली. 'मिस्टर इंडिया'मधील 'मोगैंबो', 'विधाता'मधील 'जगावर', 'मेरी जंग' मधील 'ठकराल', 'त्रिदेव'मधील 'भुजंग', 'घायल'मधील 'बलवंत राय', 'करण अर्जुन' मधील 'दुर्जन सिंह' या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तर 'दिलवाले दुल्हनियाँ'मध्ये साकारलेल्या 'चौधरी बलदेव सिंग' या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरकडून सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 

याशिवाय, अमरीश पुरी यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. रिचर्ड अँटेनबरो यांचा 'गांधी' आणि स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या 'इंडियाना जोन्स अँड टेम्पल ऑफ डुम' या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 

चित्रपटसृष्टीतील या दीर्घ प्रवासानंतर १२ जानेवारी २००५ रोजी अमरीश पुरी यांचे कर्करोगाने निधन झाले होते.