मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील २१०० शेकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. बिग बींनी स्वत: त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली आहे. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये 'जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आहे. बिहारमधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज बाकी होते त्यापैकी २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. वन टाईम सेटलमेंटनुसार त्यांचे कर्ज फेडण्यात आले आहे. काही लोकांना जनक बंगल्यावर बोलावून श्वेता आणि अभिषेक यांच्या हस्ते दिल्याचं' बिग बींनी म्हटलं आहे.
याआधीदेखील अमिताभ यांनी शेतकऱ्यांची मदत केली आहे. गेल्या वर्षी बिग बींनी उत्तर प्रदेश मधील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते. महाराष्ट्रातील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडून त्यांना मदत केली होती.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांचाही उल्लेख केला आहे. 'आणखी एक वचन पूर्ण करायचे आहे. आपल्या धाडसी जवानांनी देशासाठी पुलवामामधील हल्ल्यांत आपले प्राण दिले त्यांच्या पत्नीं आणि कुटुंबांना आर्थिक मदत करायची आहे. खरे शहीद' असं म्हणत त्यांनी जवानांप्रती आदर व्यक्त केला आहे.