'मला न सांगताच गदर 2 मध्ये...', अमिषा पटेलचा दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप, म्हणाली 'खरं तर सकीना...'

अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) नुकतंच एक्सवर 'गदर 2'च्या (Gadar 2) क्लायमॅक्ससंबंधी एक खुलासा केला आहे. आपल्याला काहीही माहिती न देता, चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलला असा आरोप तिने केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 20, 2024, 09:58 PM IST
'मला न सांगताच गदर 2 मध्ये...', अमिषा पटेलचा दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप, म्हणाली 'खरं तर सकीना...' title=

चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यू मिळाल्यानंतरही 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं होतं. चित्रपटात सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकीनाच्या भूमिकेत दिसले होते. 2001 ला 'गदर'मध्ये लहान मुलाची भूमिका निभावणारा उत्कर्ष शर्मा पुन्हा एकदा जितेची भूमिका निभावताना दिसला. चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान अमिषा पटेलने अनेक विधानं केली होती ज्यावरुन तिच्यात आणि दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. दरम्यान आता अमिषा पटेलने एक नवा आरोप केला आहे. तिच्या दाव्यानुसार, अनिल शर्मा यांनी काहीही न सांगता 'गदर 2' चा क्लायमॅक्स बदलला. 

अलीकडेच, अमीषा पटेलच्या एका चाहत्याने एक्सवर एक YouTube लिंक शेअर केली आहे,  ज्यात तिने दावा केला आहे की अनिल शर्मा यांनी अचानक चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलला होता. आधीच्या क्लायमॅक्सनुसार, अमिषा पटेल खलनायकाला ठार करते. परंतु आपला मुलगा उत्कर्षला शर्माला दाखवण्यासाठी त्यांनी अचानक बदल केला. चाहत्याने अमिषा पटेलला टॅग केलं आणि लिहिल की, “हे खरे आहे की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे”.

अमिषा पटेलनेही यावर तात्काळ आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि हे खऱं असल्यावर शिक्कामोर्तब केलं. तिने लिहिलं की, "हो, दिग्दर्शकाने क्लायमॅक्समध्ये सकीना खलनायकाला मारुन टाकते असं सांगितलं होतं. पण मला काही न सांगता तो बदलण्यात आला". पुढे ती म्हणाली की, "जे झालं ते आता जाऊ द्या. अनिलजी हे कुटुंबाप्रमाणे आहेत आणि त्यांनी याबद्दल माहिीत आहे. त्यांनाही याबद्दल वाईट वाटत असेल याची मला खात्री आहे. गदर 2 ने आधीच इतिहास रचला आहे. आता पुढे जाण्याची वेळ आहे".

यापूर्वी, हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना, अभिनेत्रीने खुलासा केला होता की, “गदरच्या सेटवरही 30-40 दिवस असे शेड्युल होते ज्यात बहुतेक वेळा मी त्यांच्याशी [अनिल शर्मा] बोलत नव्हती आणि त्यांनाही मला एखादी गोष्ट कशी कळवायची [थेट] हे समजत नसे. असिस्टंट डायरेक्टरच्या मार्फत मला कळवलं जात होतं. आमच्यात क्रिएटिव्ह मतांतर होती. आम्ही भांडतो, पण नंतर परतजुळवून घेतो.” 

मात्र, आता आपल्यात सर्व काही ठीक असल्याचं ती सांगते. “अनिल शर्मा आणि मी ठीक आहोत. उद्या जर त्यांनी मला कोणताही चित्रपट ऑफर केला तर फक्त गदर 3 का, मी त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे." सुमारे 80 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'गदर 2' ने जागतिक स्तरावर 690 कोटींहून अधिक कमाई केली. दरम्यान निर्मात्यांनी आपण 'गदर 3' बनवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे.