अक्षय कुमारने 'या' कारणासाठी बदललं नाव, कित्येक वर्षांनी केला खुलासा; म्हणाला, राजीव गांधी...

Akshay Kumar: अक्षय कुमारने नाव का बदललं याची चर्चा अनेकदा होत असतं. आता अक्षयनेच या मागचं कारण सांगितलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 21, 2024, 11:57 AM IST
अक्षय कुमारने 'या' कारणासाठी बदललं नाव, कित्येक वर्षांनी केला खुलासा; म्हणाला, राजीव गांधी...  title=
akshay kumar reveals real reason why he change his original name rajiv bhatiya

Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे खरं नाव राजिव भाटिया आहे. हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्हाला माहितीये का अक्षय कुमारने नाव बदलण्याचा निर्णय का घेतला. अनेकदा कलाकार अंधश्रद्धा आणि गुडलकसाठी खरं नाव बदलून दुसरे नाव ठेवतात. आता ही गोष्ट सामान्य झाली आहे. त्यामुळं अक्षयनेदेखील यासाठीच नाव बदललं का, ही चर्चा नेहमी होत असते. मात्र, खुद्द अक्षयनेच आता नाव बदलण्याचे कारण सांगितले आहे. अलीकडेच अक्षयने याबाबत खुलासा केला आहे.

अक्षय कुमार याने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या नाव बदलण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. माझ्या नाव बदलण्यामागे पंडित किंवा ज्योतिष सल्ला असं काही नव्हता. त्यामागे एक रंजक किस्सा आहे. अक्षयने 1987 साली महेश भट्टचा चित्रपट आज मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण या चित्रपटात तो मुख्य अभिनेता नव्हता. या चित्रपटात कुमार गौरव मुख्य भुमिकेत होते. गल्लाटा प्लसला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने म्हटलं आहे की, तुम्हाला माहितीये का चित्रपटात कुमार गौरव यांचं नाव काय होतं? त्यांच अक्षय नाव होतं. त्यामुळंच मला माझं नाव मिळालं. ही गोष्ट खूप लोकांना माहिती नाहीये. माझं खरं नाव राजीव आहे आणि चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मी सहज विचारलं की चित्रपटात हिरोचं नाव काय आहे. तेव्हा त्यांनी म्हटलं अक्षय. मी लगेचच म्हटलं की मला माझं नाव अक्षय ठेवायचं आहे. 

माझं नाव राजीवदेखील चांगलंच होतं. पण मी कोणतंही कारण नसताना माझं नाव बदललं. राजीव नाव चांगलंच आहे. मला वाटतं तेव्हा राजीव गांधी हे पंतप्रधानदेखील होते. नाव चांगलंच होतं. मी असंच नाव बदललं. मला कोणत्याही पंडितांनी नाव बदलण्याचा सल्ला दिलेला नाहीये. पण माझ्या वडिलांना मात्र माझा हा निर्णय आवडला नव्हता. पण मी त्यांनादेखील हेच सांगितलं की माझ्या पहिल्या चित्रपटातील हिरोचं नाव हेच होतं. तर मी हेच ठेवणार, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे. 

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा सिरफिरा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. राधिका मदान या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाला पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले आहेत. मात्र, बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपट थोडा मागे पडला आहे. याआधीही अक्षयचा बडे मिया छोटे मिया बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला होता. टायगर श्रॉफ आणि अक्षयची जोडी फ्लॉप ठरली होती.