दिग्दर्शन - ओम राऊत
कलाकार - अजय देवगन, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, नेहा शर्मा, पद्मावती राव
मुंबई : 'तानाजी : द अनसंग वॉरियर' (Tanhaji : The Unsung Warrior) चित्रपटात दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रत्येक दृष्यावर अतिशय बारकाईने काम केलं आहे. चित्रपट योद्धांची शूरवीरता दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरत्वाच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आहोत. पण या स्वराज्याच्या लढाईत शिवाजी महाराजांना साथ देणाऱ्या त्यांच्या साहसी योद्धावर अर्थात तानाजी मालुसरे यांच्यावर चित्रपट आधारित आहे. स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या वीर योद्धाची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. तानाजी मालुसरे यांना महाराजांचा उजवा हात मानला जात होतं.
चित्रपटात अजय देवगनने तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तानाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत काजोलने काम केलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर पाहायला मिळतोय. सैफ अली खान उदयभान राठोडची भूमिका साकारतो आहे.
ही कथा मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या यश आणि गौरवाची गोष्ट आहे. ४ फेब्रुवारी १६७० मध्ये झालेल्या सिंहगडाच्या युद्धाबाबत चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. इतिहासात या लढाईची सिंहगड युद्ध नावाने नोंद आहे. औरंगजेबला संपूर्ण भारतावर कज्बा करायचा असतो. पण तानाजी आपल्या प्राणांची पर्वा न करता कशाप्रकारे ही लढाई जिंकतात हे दाखवण्यात आलं आहे. उदयभान राठोड राजपूत आहे. पण तो औरंगजेबकडून मराठ्यांच्याविरोधात लढतो. चित्रपटात तानाजी यांची वीरता, देशभक्तीची कथा दाखवण्यात आली आहे.
चित्रपटात मराठ्यांची युद्धनिति लक्षात घेऊन, युद्धाची दृश्य चित्रित केली आहेत. पडद्यावर दाखवण्यात आलेले किल्ले, दऱ्या-खोऱ्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. ३ डी इफेक्ट्ससह चित्रपटातील युद्ध सीन आणखीन दमदार झाले आहेत.
अजय देवगनने योद्धाच्या भूमिकेत उत्तम काम केलं आहे. काजोलला चित्रपटात कमी सीन आहेत. पण जितके आहेत ते तिने उत्तम साकारले आहेत. उदयभानच्या गेटअपपासून ते अभिनयापर्यंत सैफ अली खानने उठावदार भूमिका साकारली आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकरही साजेशा दिसतो आहे.
पहिल्या भागात चित्रपट काहीसा स्लो वाटतो. पण चित्रपटातील घोडेस्वारी, युद्ध, प्राणी , ऍक्शन सीन्स दमदार दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाचा दुसरा भाग अतिशय मनोरंजक आहे. दुसऱ्या भागात पडद्यावर दाखवण्यात आलेलं युद्ध चित्रपटाशी खिळवून ठेवण्यास भाग पाडतं. चित्रपटाचा भव्य सेट, संगीत, व्हिज्युअल्सही जमेची बाजू ठरतात.