मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्रा याचा 21 मे रोजी वाढदिवस झाला. अभिनेत्री राणी मुखर्जीचा हा नवरा 47 वर्षाचा झाला आहे. 21 मे 1971 मध्ये आदित्य चोप्राचा जन्म मुंबईत झाला. लाइमलाइटपासून दूर राहणाऱ्या आदित्यने 2014 मध्ये बॉलिवूडमधील अभिनेत्री राणी मुखर्जीशी लग्न केलं. या दोघांची आदिरा नावाची मुलगी आहे.
राणीसोबत लग्न करण्याअगोदर 2001 मध्ये आदित्यने आपली बालमैत्रिण पायल खन्नासोबत लग्न केलं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही 2009 मध्ये पायल - आदित्यने घटस्फोट घेतला. पायलने घटस्फोट घेण्याअगोदरच आदित्य आणि राणीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. या गोष्टीमुळे आदित्यचे वडिल दिग्दर्शक यश चोप्रा खुश नव्हते. असं म्हटलं जातं की, यांच्यातील वादामुळे आदित्य चोप्रा घरसोडून अनेक दिवस हॉटेलमध्ये राहायला गेला होता.
असं म्हटलं जातं की, आदित्यची पहिली पत्नी पायल ही यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांच्या खूप जवळची होती. या दोघांना अजिबात वाटत नव्हतं की आदित्यने पायलला घटस्फोट देवून राणीशी लग्न करावं. मात्र मुलाच्या हट्टापुढे यश चोप्रा यांनी हात टेकले आणि आदित्य - राणीच्या लग्नासाठी ते तयार झाले. मात्र राणीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, पायलला घटस्फोट दिल्यानंतरच हे दोघं एकमेकांना डेट करू लागले होते.