मुंबई : दिवाळीचे मुख्य दिवस मागे पडले आणि प्रत्येकजण पुन्हा एकदा आपल्या आयुष्याचा गाडा लोटण्यात गुंतला. असं असलं तरीही दिवाळीच्या काही आठवणी, गप्पा-टप्पा आणि फराळही अद्याप सर्वांमध्येच सुपरहिट ठरत आहे.
दिवाळी म्हटलं की रांगोळी आलीच आणि रांगोळी म्हटलं की आला कलेचा अदभूत नजारा. काही मंडळींचं रांगोळी काढण्यावर इतकं प्रभुत्त्वं असतं की विचारून सोय नाही.
रांगोळी काढताना एखादा चित्रकार ज्याप्रमाणे त्यांच्या कुंचल्यातील रंगांची बरसात करतो, त्याचप्रमाणे रंग भरलेली रांगोळी पाहिली, की मनावर अलगद वाऱ्याची फुंकर घातल्याचा आभास होतो.
अशा या कलेवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं कमालीचं प्रभुत्त्वं आहे. सोशल मीडियामुळं तिची ही कला सर्वांसमोर आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांची आठवण या अभिनेत्रीनं शेअर करत रांगोळी कलेबाबतचं प्रेम व्यक्त केलं, काही आठवणीही सांगितल्या.
उर्मिला मातोंडकर यांना रांगोळीतून साकारणाऱ्या याच अभिनेत्रीला 20 वर्षांनंतर तिला प्रत्यत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. ज्याचा आनंद तिनं एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला. ही अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.
नुकतंच हेमांगीनं एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. जिथं उर्मिला मातोंडकर यांचीही उपस्थिती होती. हे पाहून हेमांगीचा आनंद द्विगुणित झाला.
उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी हेमांगीच्या निवेदनाचं कौतुक केलं. हे पाहून हेमांगीला नेमकं काय बोलावं हेच कळलं नाही. तिनं मोठा धीर करुन यावेळी उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत एक फोटोही काढला.
हेमांगीची ही फॅन गर्ल मोमेंट तिच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही.