मुंबई : प्रत्येक महिलेसाठी मातृत्त्वं कोणा एका आशीर्वादाहून कमी नाही. पण, बदललेली जीवनशैली आणि त्यातही आरोग्याच्या तक्रारी पाहता मातृत्त्वाच्या याच अनुभूतीपासून अनेक महिलांना वंचित रहावं लागतं. एका अभिनेत्रीसोबतही हाच प्रकार घडला होता. लग्नानंतर 5 वर्षे उलटूनही तिला आई होण्याचं सुख मिळत नव्हतं. अखेर तिनं आयव्हीएफच्या पर्यायाची निवड केली.
बाळाच्या जन्मानंतर आपला गरोदरपणापर्यंतचा प्रवास तिनं सर्वांच्या भेटीला आणला. यावेळी तिनं पैशांचं गणितही स्पष्ट सांगितलं. (Actress Debina Bonnerjee opens up on ivf cost and pregnancy)
‘देबिना डिकोड्स’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून टेस्ट ट्युब बेबीच्या संकल्पनेबद्दल आणि त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाबद्दल बोलणारी ही अभिनेत्री आहे, देबिना बॅनर्जी.
वजन वाढलं तरी, चेहऱ्यावर लकाकी आली तरी आणि कोणा कार्यक्रमात गेलं तरी आपल्याला एका प्रश्नाचा सामना करावा लागत होता, किंबहुना बऱ्याच महिलांनाही हाच प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे, 'काही गोड बातमी आहे का?'
या गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात, त्यावेळी हे प्रश्न अधिक बोचरे वाटतात असं सांगताना आपण 2017 पासून मुलासाठी प्रयत्न करत असल्याचं देबिनानं सांगितलं.
अभिनेता गुरमीत चौधरी याची पत्नी, देबिनानं आपण सुरुवातीला आययूआयचाही पर्याय समोर ठेवल्याचं सांगितलं. पाच वेळा प्रयत्न करुनही तिला यामध्ये अपयश आलं. पुढे आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान आपल्याला एंडोमेट्रियोसिस आणि एडिनोमायोसिस असल्याचं तिला निष्पन्न झालं.
हिस्टेरोस्कोपी नामक एक लहानशी शस्त्रक्रियाही तिच्यावर करण्यात आली. याचे दर 75 हजारांपासून 1 लाख रुपयांपर्यंत प्रत्येक रुग्णालयानुसार वेगळे असल्याचं तिनं स्पष्ट केलं. आयव्हीएफची (IVF) प्रक्रियासुद्धा सोपी नसल्याचं तिनं सांगितलं.
आपण या प्रक्रियेसाठी तीनदा प्रयत्न केला. प्रत्येक प्रक्रियेची किंमत साधारण 1.5 लाख रुपयांच्या घरात, असं देबिनानं सांगितलं. एका प्रक्रियेसाठी जीवनातील तब्बल 5 वर्षे खर्ची घालणं ही बाब सोपी नाही, असंही तिनं सांगितलं.
ज्यावेळी आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या प्रक्रियेला सामोरे जातो आणि तेव्हाच आपल्याला नकारार्थी उत्तर मिळतं तेव्हा होणारी निराशा शब्दांतही मांडता येत नसल्याचं वास्तव तिनं सर्वांसमोर आणलं.
गरोदर राहण्यापर्यंतच्या काळात आपण सतत सकारात्मक राहण्यासाठी काही पुस्तकं वाचल्याचं देबिनानं सांगितलं. श्रीमद् भगवत गीता, इकिगई आणि इतरही बऱ्याच लोकप्रिय लेखकांची पुस्तकं वाचण्यावर तिनं भर दिला.
एखाद्या स्त्रीसाठी गरोदरपणाचा काळ हा दिसतो तितका सोपा नसतो. शरीरात होणाऱ्या बदलांसोबतच महिलांना या दरम्यानच्या काळात मानसिक बदलांनाही सामोरं जावं लागतं. देबिनाचा हा अनुभवही हेच सर्व सांगून जातो.