मराठी शाळा बंद करुन टाका, असं का म्हणतेय ही अभिनेत्री?

ही पोस्ट सध्या अनेकांना खडबडून जागं करत आहे. 

Updated: Dec 22, 2021, 05:14 PM IST
मराठी शाळा बंद करुन टाका, असं का म्हणतेय ही अभिनेत्री?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिअॅलिटी शोच्या मआध्यमातून अनेकदा काही कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देण्याची आणि कला मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. गेल्या काही वर्षांपासून रिअॅलिटी शोला मिळणारी लोकप्रियता आणि स्पर्धकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता अशा अनेक स्पर्धांनी जन्म घेतला. 

वेगवेगळा वाहिन्यांवर सध्या तितक्याच वेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या स्पर्धा सुरु आहेत. पण, याच रिअॅलिटी शोपैकी एका कार्यक्रमामुळं आता नव्या वादाला तोंड फुटू शकतं.

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद', असं त्या कार्यक्रमाचं नाव. 

नुकताच या शोशी संबंधित एक व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला. 

इथं सुत्रसंचालक व्यासपीठावर स्पर्धक म्हणून असणाऱ्या दोन लहान मुलांना मिळालेल्या गुणांची बेरीज विचारताना दिसतो. 

उत्तर म्हणून हा मुलगा इंग्रजीमध्ये आकडा सांगतो. पण, त्यानंतर मराठीमध्ये आकडे विचारल्यास मात्र त्याची तारांबळ उडते. 

पुढे तिथेच असणाऱ्या दुसऱ्या एका लहान मुलीशीही या मराठी अंकांच्या मुद्द्यावरुन हा सूत्रसंचालक विनोदी अंदाजात संवाद साधताना दिसतो. 

परीक्षक म्हणून असणाऱ्या सचिन पिळगावकर, वैशाली सामंतही यावर विनोदी अंगानंच व्यक्त होत आहेत. 

मुळात हा सर्व प्रकार पाहून अभिनेत्री चिन्मयी सुमीत हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी संतप्त सूर आळवत मराठी शाळाच बंद करा असंही म्हटलं आहे.

व्हिडीओ जोडत या पोस्टमध्ये चिन्मयीनं हळुहळू हे असंच होणार आहे असं म्हणत मराठी भाषेसंदर्भातील ज्ञानाची येत्या काळात होणारी अवस्था कशी असेल याकडे सर्वाचं लक्ष वेधलं. 

खरा-खोटा इतिहास, चुकीचा इतिहास अशा मुद्द्यांवर संस्कृतीचा ठेका घेऊन वादंग माजवणारे लोक मराठीबद्दल काहीच भूमिका का घेत नाहीत, असा खडा सवाल केला. 

'मराठीची खिल्ली उडवली जाण्याचा इतका उबग आलाय आता की, सरकारने एक आदेश  काढून एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा...'

अशा संतप्त स्वरात तिनं सध्याची परिस्थिती आणि एकदरच त्यावर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. 

चिन्मयीची ही पोस्ट सध्या अनेकांना खडबडून जागं करत आहे. 

एकेकाळी मराठी माध्यमांतूनच शिक्षण घेऊन पुढे आलेल्या मंडळींनंतरची पिढी नेमकी मराठी भाषेकडेच कोणत्या दुय्यम दृष्टीकोनातून पाहतेय याबाबतच विचार करायलाही भाग पाडत आहे.