'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार

तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला आहे. 

आकाश नेटके | Updated: Sep 29, 2023, 09:21 AM IST
'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार title=

Tamil Actor Vishal Bribe Case : दाक्षिणात्य अभिनेता विशालने (Actor Vishal) सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. नुकत्याच आलेल्या 'मार्क अँटनी' या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन मंजूर करण्यासाठी आपल्याला 6.5 लाख रुपयांची लाच (Bribe) द्यावी लागली, असे अभिनेता विशालने म्हटलं आहे. अलीकडेच विशालचा 'मार्क अँटनी' (mark antony) हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. याप्रकरणी त्याने आता थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे (CM Ekanth Shinde) यांना याप्रकरणात लक्ष्य घालण्याची विनंती केली आहे.

अभिनेता विशाल हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र आता विशालने त्याच्यासोबत झालेल्या भ्रष्टाचाराचा खुलासा केला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. विशालने केलेला आरोप पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्याने अगदी उघडपणे अशा प्रकारे आरोप केले आहेत.

विशालने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मौन सोडले आहे. 'भ्रष्टाचारसारखा मुद्दा पडद्यावर दाखवणे ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात ते योग्य नाही. हे पचत नाही तेही सरकारी अधिकारी असताना. पण सीबीएफसीच्या मुंबई कार्यालयातही तेच सुरू आहे. मार्क अँटोनी चित्रपटाचे हिंदी व्हर्जन पास करण्यासाठी मला 6.5 लाख रुपये मोजावे लागले, असे विशालने म्हटलं आहे.

"मी हा प्रश्न महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत आहे. माझा कष्टाचा पैसा भ्रष्टाचारात वाया गेला आहे. म्हणून मला तुमच्याकडून आशा आहे की नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल," असेही अभिनेता विशालने म्हटलं आहे.

"प्रमाणपत्रासाठी आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे अर्ज केला. पण शेवटच्या क्षणी आमच्या चित्रपटाला मंजुरी नाकारण्यात आली. माझे मॅनेजर स्वतः तिथे होते. तिथल्या अधिकाऱ्यांनी साडेसहा लाख रुपयांची मागणी केली. एक महिला अधिकारी होती, तिने सांगितले की पैसे द्यावे लागतील. मी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले. आम्ही त्यांना रोख रक्कम देणार नाही, असे मी मॅनेजरला स्पष्टपणे सांगितले होते. पण ही कमाई आमच्या मेहनतीची होती जी अशा लाचखोरीत वाया गेली," असे विशालने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेता विशालने सांगितले की, त्याने हे पैसे दोनदा दिले.आधी तीन लाख रुपये आणि नंतर साडेतीन लाख रुपये सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला देण्यात आले. सेन्सॉर बोर्डाने माझ्याने कोणताही पर्याय ठेवला नव्हता. मी माझ्या चित्रपटात सर्व काही गुंतवले होते. हा चित्रपट हिंदी आवृत्तीतही प्रदर्शित होणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते, असेही अभिनेता म्हणाला.