Nana Patekar On Welcome 3 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'वेलकम' हा चित्रपट सुपरहिट ठरला. तब्बल 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 प्रदर्शित झालेला 'वेलकम' या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या चित्रपटातील RDX, मजनू भाई, उदय शेट्टी यांच्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. हे दोघेही 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलकम 2' या चित्रपटातही झळकले होते. यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यात नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आता यावर नाना पाटेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पाटेकर यांनी 'लल्लनटॉप' या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत नाना पाटेकर यांना ते 'वेलकम 3' या चित्रपटात तुम्ही आणि अनिल कपूर का नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी फारच मनमोकळेपणाने भाष्य केले. या चित्रपटात उदय शेट्टीची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती. तर मजनू भाईच्या भूमिकेत अनिल कपूर झळकले होते. यावेळी नाना पाटेकर म्हणाले, "2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेलकम' या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शक अनीस बज्मी यांना जाते. ते सुरुवातीला उदय शेट्टीच्या भूमिकेबद्दल गोंधळले होते."
"पण जर या चित्रपटात मजनू भाई म्हणून अनिल कपूर नसते, तर कदाचित उदय शेट्टीची भूमिका पूर्ण झाली नसती. अनिल कपूर आणि मी या एकत्र असल्यानेच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. त्यामुळे जर त्यांनी उदय शेट्टीचे पात्र या चित्रपटात ठेवले नसते तर 'वेलकम' चित्रपट हिट झाला नसता", असे नाना पाटेकरांनी म्हटले.
"'वेलकम बॅक' हा चित्रपट इतका हिट झाला नाही. याच कारणाने मी आणि अनिलने अहमद खान दिग्दर्शित 'वेलकम 3' साठी नकार दिला. आम्हाला या चित्रपटासाठी संपर्क करण्यात आला होता. पण मी स्पष्टपणे नकार दिला. कारण यात काही कथा नव्हती आणि मला काहीही मजा वाटली नाही", असे नाना पाटेकरांनी सांगितले.
दरम्यान 'वेलकम टू दी जंगल' हा चित्रपट येत्या 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन फरहाद सामजीने केले आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, आफताब शिवदसानी, अरशद वारसी, परेश रावल, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार झळकणार आहे. त्यासोबतच यात तुषार कपूर, श्रेयस तळपदे, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी हेदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत.