मुंबई : मायानगरीत कित्येक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. स्वप्नांच्या नगरीत अनेकांच्या वाट्याला यश येतं, तर काहींना प्रतीक्षा करावी लागते. तर दुसरीकडे कलाकार यशाच्या उच्च शिखरावर पोहोचतात, पण ते स्वप्नांचा प्रवास अर्ध्यात सोडून जातात. 'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीने 2016 साली वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिने राहत्या घरात गळफास घते झगमगत्या विश्वाला अखेरचा निरोप दिला. तिची आत्महत्या आजही एक रहस्य आहे.
प्रत्यूषाने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा ते आई-वडील झारखंडमध्ये होते. जेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते तात्काळ मुंबईच्या दिशेने निघाले. ते मुंबईत पोहोचेपर्यंत फार उशिर झाला होता. प्रत्यूषाला जेव्हा शेवटचा निरोप दिला जात होता तेव्हा तिच्या आईने लेकीच्या आवडतीचं गाणं गायलं.
'आज जाने की जिद ना करो...' या गाण्याचे बोल जेव्हा प्रत्यूषाच्या आईच्या स्वरातून आले तेव्हा जमलेल्यांध्ये भावूक वातावरण झालं. तेव्हा प्रत्युषाच्या आई-वडिलांना सांभाळण्यासाठी तिचे खास मित्रमंडळी त्यांच्यासोबत होते. टीव्ही विश्वातील हायपेड अभिनेत्री असलेल्या प्रत्यूषाने आयुष्याचा शेवट केला.
प्रत्युषाचं जाणं तिच्या कुटुंबासाठी एक मोठा आधार हिरावण्यासारखं होतं. तिच्या नसण्यामुळं कुटुंबाचं पुरतं आयुष्यंच बदललं. आता तिच्या आईवडिलांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. 'आजतक'शी संवाद साधताना प्रत्युषाचे वडील शंकर बॅनर्जी यांनी मुलीच्या निधनानंतर आयुष्यात वादळच आलं आणि सारंकाही हिरावून गेलं अशी भावना व्यक्त केली. या प्रकरणाचा खटला लढता लढता त्यांनी सर्व आर्थिक पाठबळ गमावलं आणि आता मात्र त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.