मुंबई : 'भारत'फेम बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. मुंबईस्थित एका पत्रकाराने सलमानविरोधात तक्रार दाखल केली आहे. सलमान आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तींविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. गैरवर्तणूक, शिवीगाळ असे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहे.
अशोक एस. पांडे यांनी अंधेरी न्यायालयात सलमान, त्याचा सहकारी विजय आणि आणखी एका अज्ञात इसमाविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली.
१२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी आहे. त्याचवेळी या प्रकरणात पोलीस तपासणीचे आदेश दिले जाणार की, न्यायालयाकडून सलमानला समन्स बजावण्यात येणार याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही वकील नीरज गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला दिली.
Mumbai: A criminal complaint has been filed against actor Salman Khan by one Ashok Pandey before Metropolitan Magistrate Court, Andheri, for robbery, assault, criminal mischief & criminal intimidation.
— ANI (@ANI) June 25, 2019
नेमकं घडलं तरी काय?
सलमानविरोधात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीच्या पत्रकात नमूद केल्यानुसार पांडे हे २४ एप्रिल रोजी पांडे जुहू येथून कांदिवलीला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी कॅमेरामन सय्यद इरफानही त्यांच्यासोबत होता. त्यावेळी त्यांनी सलमानला सायकल चालवतावा पाहिलं. दोन सहकारी त्याच्यासोबतच होते. त्याच सहकाऱ्यांकडून पांडे यांनी सलमानचं चित्रीकरण करण्याची परवानगी घेतली.
चित्रीकरण सुरू करताच सलमानच्या ही बाब लक्षात आली आणि त्याचवेळी त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांनी कार चालकाला आणि पत्रकाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सलमानेही या प्रकरणात उडी घेत पांडे यांच्यासाठी वाईट शब्दांचा वापर केला, त्यांच्या हातातून मोबाईल घेत व्हिडिओ आणि काही महत्त्वाची माहिती डिलीट करण्याचा प्रयत्न केला.
पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डी.एन. नगर पोलीस स्थानकात याविषयीची तक्रार दाखल करण्याच्या हेतूने त्या दिशेने पावलं उचलली. त्यांनी तक्रार दाखलही केली. पण, जवळपास दोन महिन्यांनी संबंधित पोलीस स्थानक अधिकाऱ्यांनी असा कुठलाही गुन्हा घडलाच नाही हे कारण देत प्रकरण निकालात काढलं.
एकिकडे पोलिसांची अशी भूमिका असतानाच दुसरीकरडे झोएब नावाचा एक व्यक्ती पांडे यांना फोनवरुन वारंवार तक्रार मागे घेत प्रकरण मिटवण्याची विचारणा करत होता. पण, पांडे मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर त्यांनी यासाठी न्यायालयाचं दार ठोठावत या प्रकरणी कारवाई आणि चौकशीची विचारणा केली आहे.