Actor alleged for cheating and Car Theft: बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर' हा दहा वर्षांपुर्वी प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी नुकतीच समोर येत आहे.
हा अभिनेता एक पटकथा लेखकही आहे. या अभिनेत्यावर एका चित्रपट निर्मात्याने फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि त्याने आपल्या आरोपात म्हटले आहे की त्याने त्यांची 26 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची बातमी समोर येते आहे.
'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाचा अभिनेता आणि पटकथा लेखक झीशान कादरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. कादरी यांच्यावर फिल्म फायनान्सर आणि निर्मात्या शालिनी चौधरी यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणी कारवाई करत अभिनेत्याविरुद्ध मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात कलम 420-406 अंतर्गत फसवणूक आणि कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालिनी यांचा आरोप काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार शालिनी चौधरी यांनी सांगितले की, ''मी माझ्या दोन मुलांसह मालाडमध्ये राहते. माझी 'शालिनी चौधरी फिल्म्स' नावाची कंपनी आहे. मी झीशान कादरी यांना 2017 मध्ये भेटले. सोनी एंटरटेनमेंटच्या क्राईम पेट्रोल या शोसाठी त्याला फायनान्सची गरज होती. 'फ्रायडे टू फ्रायडे' या त्यांच्या एका कंपनीत प्रियांका बस्सी या भागीदार होत्या. आम्ही एकत्र क्राईम पेट्रोल शो केला आणि त्यांच्या कंपनीसाठी 'हलाल' नावाचा चित्रपटही केला. त्यामुळे माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.
परंतु त्यावेळी झीशानने शालिनीला सांगितले की, शोमध्ये काम करण्यासाठी त्याच्याकडे कार नाही. शालिनीचा विश्वास जिंकून तिने तिची Audi-A-6 कार घेतली, ज्याचा क्रमांक MH14 FM 3212 आहे. पण काही वेळाने झीशाननेही शालिनीचे कॉल उचलणे बंद केले. त्याने ती कार चोरल्याची खात्री शालिनींना वाटतं. आता यासंदर्भात पोलीस पुढील कारवाई करत आहेत.