मंगेशकर कुटुंबासाठी बिग बींनी लिहिली 'या' पुस्तकाची प्रस्तावना

ते पुस्तक आता हिंदीतही... 

Updated: Sep 21, 2019, 03:16 PM IST
मंगेशकर कुटुंबासाठी बिग बींनी लिहिली 'या' पुस्तकाची प्रस्तावना  title=
मंगेशकर कुटुंबासाठी बिग बींनी लिहिली 'या' पुस्तकाची प्रस्तावना

मुंबई: भारतीय संगीत क्षेत्रात अतिश मोलाचं योगदान देणारं मंगेशकर कुटुंब पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची बहीण आणि प्रसिद्ध संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांचं आत्मवृत्त गेल्या वर्षी प्रकाशित झालं. याच पुस्तकाचा हिंदी अनुवाद आता सर्वांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. 'दीदी और मैं' असं या पुस्तकाचं नाव आहे, ज्याचं प्रकाशन २९ सप्टेंबर, २०१९ रोजी खुद्द लतादीदींच्या हस्ते मुंबईत होणार आहे. 

'दीदी और मैं' या पुस्तकात मीनाताईंनी साऱ्या देशाचं भूषण असलेल्या लतादीदींच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा संपूर्ण आलेख आपल्या शैलीत मांडला आहे. यामध्ये काही आठवणी, कुटुंबासोबतचे खास क्षण आणि मंगेशकर कुटुंबाची काही दुर्मिळ आणि गतकाळातील छायाचित्र पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. दीदींच्या ९०व्या वाढदिवसाच्याच निमित्ताने 'दीदी और मैं' प्रकाशित होत असल्याचा आनंदही मीना मंगेशकर यांनी व्यक्त केला.  

महानायक अमिताभ बच्चन यांनी 'दीदी और मं'या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे पहिल्या पानापासूनच पुस्तक हे खिळवून ठेवणारं ठरेल असं स्पष्ट होत आहे. सुप्रसिध्द पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी मूळ मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला आहे. 

अनुवादित पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचण्यापूर्वी वाचकांनी 'मोठी तिची सावली'चंही मनापासून स्वागत केलं आहे. एक प्रयोगशील संगीतकार म्हणून मीना मंगेशकर हे नाव सर्वांनाच परिचयाचं आहे. 

 'शाबाश सुनबाई', 'माणसाला पंख असतात', 'रथ जगन्नाथाचा' आणि 'कानून का शिकार' अशा मराठी तसंच हिंदी चित्रपटांना मीनाताईंनी संगीत दिलं होतं. त्यांनी स्वरबध्द केलेली बालगीतं तर आजही अनेकांच्याच मनावर राज्य करतात. त्यापैकी  'चॉकलेटचा बंगला', 'सांग सांग भोलानाथ', ही गीतं तर फक्त लहानांनाच नव्हे, तर मोठ्यांनाही आवडली. 

मीना मंगेशकर यांची कारकिर्द पाहता, लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अनेक कार्यक्रमांत मीनाताईंचा सहभाग होता. तसंच, अनेक हिंदी सिनेमांतही त्यांनी दीदींबरोबर पार्श्वगायन केलं आहे. ‘मदर इंडिया' या गाजलेल्या चित्रपटातलं 'दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा' या नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतामध्ये लतादीदींसोबतच मीनताईंचा आवाजही श्रोत्यांच्या कानावर पडला.