मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले यूपीएससी परीक्षा ( UPSC Examination) विद्यार्थ्यांचे आंदोलन (Students' agitation )मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. जंतर-मंतर येथे नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यांना मिळणारे विद्यावेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. सारथी यंत्रणा त्यांच्या अध्ययनात अडसर ठरली होती. बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लक्ष घालत विद्यार्थ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आगामी काळात देखील सारथीबाबतच्या सर्व अडचण निवारण करण्याची हमीही त्यांनी यावेळी दिली.
#BreakingNews । सारथीच्या माध्यमातून विद्यावेतनसाठी सुरू असलेल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे दिल्लीतलं आंदोलन मागे । बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवारांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांची माघार https://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/qVLTU4RJRM
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 17, 2020
देशाची राजधानीत नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या अडीचशे मराठी विद्यार्थ्यांनी जंतरमंतर येथे सुरू केलेले आंदोलन महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्की ठरले होते. दिल्लीतील या मराठी विद्यार्थ्यांना सारथीच्या यंत्रणेची मोठी अडचण जाणवू लागली होती. गेले तीन महिने या विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन रखडल्याने दिल्लीत निवास -भोजनाचे मोठे संकट ओढवले होते. आपल्या उज्वल भविष्याची स्वप्ने रंगवत राजधानीत पोहोचलेल्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजी धोरणाने आंदोलक बनविले होते.
सकाळपासून याबाबत विविध राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र सरकारने हालचाली सुरू केल्या. बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची थेट चर्चा केली. यात त्यांनी पुढील तीन दिवसांत विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याशिवाय सारथी यंत्रणेतील सर्व अडचणी निवारण करण्याची हमीदेखील दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. सरकार संपूर्ण ताकदीनिशी या मराठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.