अकरावी प्रवेश तिढा : १० टक्के जागा वाढविण्याची राज्य सकारची घोषणा

अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

Updated: Jun 18, 2019, 01:11 PM IST
अकरावी प्रवेश तिढा : १० टक्के जागा वाढविण्याची राज्य सकारची घोषणा title=
संग्रहित छाया

दीपक भातुसे, मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत विज्ञान महाविद्यालयात ५ टक्के, तर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात १० टक्के जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे, नागपूरमधील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या सरसकट सर्व शाखांच्या १० टक्के जागा वाढवून दिल्या जाणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत आज ही घोषणा केली. 

अकरावीसाठी राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई या महाविद्यालयातील जागा वाढवल्या जाणार आहेत. दहावीतील राज्य मंडळाच्या विद्यार्थींचे अंतर्गत गुण बंद केल्याने सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे गुण हे दहावीतील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा जास्त होते. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचा मार्ग अवघड झाला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी जागा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
अंतर्गत गुण बंद केल्याने झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी आणि विद्यार्थींमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाने दहावीचे अतंर्गत गुण बंद केल्याने विद्यार्थींचा निकाल यंदा कमी लागला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सरकारबद्दल नाराजी होती. ती नाराजी काही प्रमाणात आता दूर होण्याची शक्यता आहे.