नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित केजरीवालनेही १२वीची परीक्षा दिली होती. त्याचवेळी केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचा मुलगा जोहरनेही बारावीची परीक्षा दिली होती. दोघेही चांगला गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. केजरीवाल यांचा मुलगा पुलकित हा ९६.४ टक्के गुण घेत १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ही माहिती केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी ट्विट करत दिली.
दरम्यान, उत्तरप्रदेशमधील गाजिबादमध्ये राहणाऱ्या हंसिका शुक्ला आणि मुजफ्फरनगरमधील करिश्मा अरोराने सीबीएसई १२वीमध्ये संयुक्तरित्या देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेसाठी १३ लाख विद्यार्थी बसले होते. तर स्मृती ईरानी यांचा मुलगा जोहरनेही बारावीत चांगले यश संपादन केले आहे. जोहर ९४ टक्के गुण मिळवत १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मुलगा पास झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केला आहे.
स्मृती इराणी यांनी ट्विट केले आहे, जोहरचा मला अभिमान आहे. प्रमुख चार विषयांमध्ये त्याला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. अर्थशास्त्रमध्ये ९४ गुण घेतल्याचा जास्त आनंद होत आहे. त्याचा मला जास्त आनंद झालाय. मला माफ करा, पण आज मी फक्त आई आहे.