सिंधिया, बंड आणि भाजप कनेक्शन

ज्योतिरादित्य सिंधिया यांची आजी राजमाता विजयाराजे सिंधिया आणि वडील माधवराव सिंधिया यांचा राजकीय प्रवास कधी काँग्रेस तर कधी भाजप असा झाला आहे.

Updated: Mar 10, 2020, 03:34 PM IST
सिंधिया, बंड आणि भाजप कनेक्शन title=

विठोबा सावंत, झी मीडिया, मुंबई : ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजपच्या जवळ जाण्यानं सिंधिया घराण्याचं भाजप कनेक्शन चर्चेत आलं आहे. ग्वाल्हेर संस्थानचे संस्थानिक असलेल्या सिंधियांच्या वारसदारांनी आजवर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आपला राजकीय प्रभाव कायम राखला आहे. 

विजयाराजे, माधवराव सिंधिया यांचा राजकीय प्रवास

ज्योतिरादित्य सिंधिया यांची आजी राजमाता विजयाराजे सिंधिया आणि वडील माधवराव सिंधिया यांचा राजकीय प्रवास कधी काँग्रेस तर कधी भाजप असा झाला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप जवळीकीमुळे आता ही परंपरा कायम राहिली आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर प्रांतात सिंधिया यांचं राजकीय वर्चस्व राहिलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आजी असलेल्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी १९५७ साली काँग्रेसमधून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. 

१९५७ मध्ये त्या गुणा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. १९६७ मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसचं डी. पी. मिश्रा यांचं सरकार होतं. 

काँग्रेस सोडून तत्कालीन जनसंघात प्रवेश

विजयाराजे सिंधिया यांनी तेव्हा पक्षात उपेक्षा झाल्यानं काँग्रेस सोडून तत्कालीन जनसंघात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर ग्वाल्हेर प्रांतात जनसंघ मजबूत होण्यास मदत झाली. 

१९७१ साली इंदिरा गांधींच्या लाटेत विरोधी पक्षांची पिछेहाट झाली, पण अशा स्थितीतही ग्वाल्हेर प्रांतातील तीन जागा जनसंघानं जिंकल्या. भिंड मतदारसंघातून राजमाता विजयाराजे सिंधिया, गुणा मतदारसंघातून माधवराव सिंधिया आणि ग्वाल्हेरमधून अटलबिहारी वाजपेयी जनसंघाकडून निवडून आले.

माधवराव वयाच्या २६ व्या वर्षी गुणामधून विजयी

ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव सिंधिया वयाच्या २६ व्या वर्षी गुणामधून जनसंघाकडून निवडून आले. पण आणीबाणीनंतर १९७७ साली त्यांनी जनसंघाची साथ सोडली आणि काँग्रेसची वाट धरली. 

१९८० मध्ये ते गुणामधून काँग्रेसकडून निवडून आले आणि मंत्री बनले. १९९३ मध्ये जेव्हा मध्य प्रदेशात काँग्रेसचं दिग्विजय सिंह सरकार होतं, तेव्हा उपेक्षा झाल्यानं माधवराव सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मध्य प्रदेश विकास काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पण काही वर्षांनी ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. 

ज्योतिरादित्य सिंधिया माधवरावांचे वारसदार

३० सप्टेंबर २००१ रोजी मैनपुरीजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया त्यांचे वारसदार ठरले आणि गुणामधून सलग निवडून येत युपीए सरकारमध्ये मंत्रीही बनले. २०१९ च्या निवडणुकीत मात्र गुणा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दोन्ही आत्या मात्र सुरुवातीपासूनच भाजपमध्येच राहिल्या. त्यांची एक आत्या वसुंधराराजे सिंधिया राजस्थानच्या दोनदा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्या राजस्थानमधील भाजपच्या प्रमुख नेत्या असून त्यांचे पुत्र दुष्यंत झालवाडचे खासदार आहेत.

ज्योतिरादित्य यांची दुसरी आत्या यशोधराराजे १९७७ मध्ये अमेरिकेत गेल्या. पण १९९४ मध्ये परत आल्यानंतर त्यांनी भाजपमधून राजकारण सुरु केलं. त्या मध्य प्रदेशमध्ये ५ वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत आणि शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलं आहे.