प्रद्युम्नच्या हत्येचे कारण सर्व पालकांना हादरविणारे....

  सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.... हे आपण लहानपणी गाणे ऐकले असेल किंवा गायलेही असेल...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 17, 2017, 11:48 PM IST
प्रद्युम्नच्या हत्येचे कारण सर्व पालकांना हादरविणारे.... title=

प्रशांत जाधव, झी मीडिया, मुंबई :  सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.... हे बडबड गीत आपण लहानपणी  ऐकले असेल किंवा गायलेही असेल...

सुट्टी ही सर्वांना प्रिय असते. शाळेला काहीही करून सुट्टी मिळाली पाहिजे अशी मानसिकता प्रत्येक विद्यार्थ्याची असते. विद्यार्थीच काय पण नोकरी करणाऱ्या कर्मचारी वर्गही बहुतेकवेळा वेगळा विचार करत नाही. एखादी घटना घडली की त्यामुळे ऑफीसला सुट्टी मिळेल का असा विचार प्रत्येकाच्या मनात येऊन जातो.
  
या बडबड गीतातील दुसरं कडवं म्हणजे आज आहे गणिताचा पेपर... पोटात कळ येऊन दुखेल कारे ढोपर...  असे काहीसे विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या काळात होते. परीक्षा ही कोणालाही खूप आवडत नसते. त्याचे टेन्शन येते. ते विद्यार्थी असो वा पालक.... पालक हे विद्यार्थी असताना त्यांनाही परीक्षेचे टेन्शन घेतलेले असते. तेच टेन्शन ते पुढे कॅरी-फॉरवर्ड करतात.

अशाच टेन्शनमुळे किती गंभीर अपराध होऊ शकतात याचं उदाहरण आज समोर आलं आहे. दिल्लीच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठ सप्टेंबर रोजी झालेल्या प्रद्युम्न हत्याकांडाला आज वेगळ वळण लागलं आणि सर्व पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आपला मुलगा किंवा मुलगी शाळा कॉलेजात किती सुरक्षित आहे यावरून पालकांना धडकी भरली आहे.

असे काही तरी करायला पाहिजे ज्यामुळे अकरावीची परीक्षा आणि पालक शिक्षक मिटींग ही पुढे ढकलली जावी, यासाठी अकरावीत शिकणाऱ्या मुलाने चाकूने गळा चिरून प्रद्युम्नची हत्या केल्याचा आरोप सीबीआयने लावला आहे. 
काही तरी विपरीत करावे, त्यामुळे शिक्षक पालक मिटिंग पुढे ढकलली जावी, यासाठी तो शाळेत चाकू घेऊन आला होता. त्याला शाळेच्या टॉयलेटमध्ये बिचारा प्रद्युम्न दिसला आणि त्याच्या गळ्यावर चाकूचे वार केले. नंतर चाकू फ्लश केल्याचे सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अकरावीतील एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला जुवेनाईल जस्टीस बोर्डासमोर हजर करण्यात येणार आहे.

या सर्व प्रकारानंतर काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. पालक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यांना अधोरेखित करणारे हे प्रश्न प्रत्येक पालकाला लागू होतील. ते प्रत्येकाने स्वतःला विचारावे.
 

१) पालक-शिक्षक मिटिंग अकरावीच्या विद्यार्थ्याला पुढे का ढकलावीशी वाटली? मिटिंग पुढे ढकलण्यामागे नेमकी कसली भीती होती? अशी भीती आपल्या पाल्यालाही आहे का ते चेक करा...

२) अकरावीतील मुलामध्ये छोट्या गोष्टीसाठी एखाद्याला इजा पोहचवून, त्याची हत्या करण्याची मानसिकता कुठून आली असावी? अशी हिंसक मानसिकता आपल्या मुलामध्येही आहे का? ती त्याचा वागण्या-बोलण्यातून समोर येते का? हे चेक करा...

३) आपण पाल्यांना गुणांसाठी किंवा परीक्षेत चांगली कामगिरी करावी यासाठी दबाव टाकतो का, त्या दबावाचा परिणाम विपरीत होऊ शकतो याची जाणीव प्रत्येक पालकाला आहे का?

४) स्पर्धात्मक युगात आपला मुलगा शिक्षण, स्पोर्ट्स इतर अॅक्टिव्हीटीमध्ये मागे राहू नये यासाठी जी पालकांची चढाओढ असते, त्याचा बळी हा प्रद्युम्न आहे का?  आपण आपल्या पाल्यावर अव्वल येण्यासाठी दबाव टाकतोय का?

५) तंत्रज्ञान, इंटरनेट आणि टीव्हीवर चालणाऱ्या क्राइमच्या मालिका या दुधारी तलवारी आहेत, त्याचा वापर योग्यपणे करण्याचे प्रशिक्षण हे आपल्या पाल्यांना आपण देतोय का? मुळात हे प्रशिक्षण पालकांना आहे का?

६) समाजात जगताना आपल्या पाल्याने काय काळजी घ्यायची याची शिकवण आपण रोज त्यांना आपल्या वागण्या-बोलण्यातून देतो का?

७) पालकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पाल्यांशी असलेला संवाद कुठेतरी हरवला आहे का?

८) गुण कमी पडले तरी चांगला माणूस म्हणून तू समाजात ओळखला जायला पाहिजे, याची जाणीव आणि शिकवण आपण पाल्यांना देतो का?

हे बेसीक प्रश्न जरी एखाद्या पालकाला पडले तरी त्यांचा मुलगा समाजात सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित ठेवायला हातभार लावेल.

सुट्टीची मानसिकता...
 

विद्यार्थ्यांमध्ये सुट्टीची मानसिकता असते.  कोणत्याही कारणाने शाळेला सुट्टी मिळाली तर त्यांना हवी असते. मी या ठिकाणी माझ्या शाळेतील दिवस आठवतो तर मला आणि माझ्या वर्गातील मित्रांनाही कोणत्याही कारणाने सुट्टी मिळाली आनंद व्हायचा. 
मग आमच्या गावातील नदीला पूर आला, जोराचा पाऊस आला. एखाद्या माजी शिक्षकाचे वृध्दापकाळाने निधन झाले. तर शाळेत श्रद्धांजली देऊन शाळा सोडण्यात यायची. कोणाच्याही निधनामुळे मिळालेल्या सुट्टीचा तेव्हा आनंद व्हायचा. पण कोणाच्याही निधनाचा आनंद होणं चुकीचं असल्याचं त्या वयात समजतही नव्हतं. 

एखादा माणूस जगातून जाणे हे त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठी वेदनादायक गोष्ट असते. तुम्ही एक दिवस सुट्टी मिळाली म्हणून आनंद व्यक्त करतात पण त्यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होते, हे आम्हाला एका शिक्षकानं सांगितलं. 

आपल्या जवळची व्यक्ती गेली नाही ना... त्यामुळे आपल्याला दुःख का व्हायला हवे ही मन बोथट करणारी मानसिकता आपल्या पाल्यामध्ये रुजायला नको याची काळजी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे.

फक्त दीड मार्क कमी असल्याचा दुखवटा...
 

नुकताच एक किस्सा माझ्या टीममधील अर्चनाने सांगितला. मुलाला २५ पैकी २३.५ मार्क मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी आई मुलाला दीड मार्क कमी का पडला याचा जाब विचारत होती. पहिलीत शिकणाऱ्या त्या ६ वर्षांच्या मुलाला भरलेल्या ट्रेनमध्ये आई ओरडत होती. हीच मानसिकता आपली पालकांची झाली आहे.

चांगला माणूस म्हणून घडावे...
 

मीही एका मुलाचा बाप आहे. पण आपल्या मुलाने माणूस म्हणून मोठे होणे गरजेचे आहे. तो चांगल्या गुणाने पास होण्यापेक्षा तो समाजात चांगला माणूस म्हणून घडावा ही माझी अपेक्षा असेल. अशी अपेक्षा सर्व पालकांनी करावी.

मुलांना आपला धाक न बसवता आपण मित्र बनून राहिलो तर ते त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतील. हे प्रॉब्लेम शेअर होणं खूप गरजेचे आहे. तसं झालं नाही तर मग त्यांच्या मनात वादळ निर्माण होते. कायम त्यांच्या मनात वाऱ्याच्या हळूवार झुळूक निर्माण व्हाव्यात याचा पालक म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे.

बाकी काय... अजून काय सांगणे... तुम्ही समजूतदार आहात... आपल्या मुलांची काळजी घ्या...