'बिग बुल'ला आठवताना...

 रविवारची सकाळ फारच वेदनादायी... भारताचा वॉरेन बफेट म्हणून नावलौकिक कमावलेले राकेश झुनझुनवाला आपल्यातून निघून गेले  

Updated: Aug 14, 2022, 06:55 PM IST
'बिग बुल'ला आठवताना... title=

निनाद झारे,झी मीडिया मुंबई : राकेश झुनझुनवालांना आठवताना रविवारची सकाळ फारच वेदनादायी ठरली. एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढणारे विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाले. दुसरीकडे साधारण त्याच सुमारास शेअर बाजारातला बिग बुल म्हणून प्रसिद्ध असणारे आणि भारताचा वॉरेन बफेट म्हणून नावलौकिक कमावलेले राकेश झुनझुनवाला आपल्यातून निघून गेले. सात आठ महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पण इतक्या लवकर जगाचा निरोप घेतील असे कोणाला ध्यानीमनी वाटलं नव्हतं. गेल्या आठवड्यातच सात ऑगस्टला त्यांनी त्यांचं पहिलं एअरलाईन वेंचर लॉन्च केलं. 

आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वासाठी आणि मतांसाठी प्रसिद्ध असणारे राकेश झुनझुनवाला शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच माहिती होते. 1991 साली भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारलं त्याला आता जवळपास 31 वर्षे पूर्ण झाली. झुंझुनवाला हे याच काळातले अतिशय कुशाग्र गुंतवणूकदार ठरले. गेल्या तीन दशकात त्यांचे दृष्टेपण भारतातील अतिशय यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक बनवून गेलं. 

साधारण ४० हजार कोटीचा पोर्टफोलिओ आणि लाखो गुंतवणूकदारांचा विश्वास त्यांनी या काळात मिळवला. बाजारात या काळात अनेक चढ-उतार झाले. अमेरिकेतील 2008 सालची मंदी असो की कोरोनाच्या काळात आलेली पडझड राकेश झुनझुनवाला यांनी स्वतः चा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास काहीही नाही. उलट पुढील 25 वर्षात भारत चीन आणि अमेरिका या दोन्ही बलाढ्य अर्थव्यवस्थांना मागे टाकेल असा दृढ विश्वास त्यांनी भारतीय गुंतवणूकदारांमध्ये निर्माण करण्याचा परोपरी प्रयत्न केला. असं करत असताना ते कधीही आपल्या वक्तव्यांच्या विपरीत वागाल्याचं आपल्याला आढळत नाही. त्यांच्याकडे एक निराळाच कसं होतं.

कंपन्यांची मॅनेजमेंट आणि त्यांचे भविष्य हे त्यांना जोखता यायचं. दुसरीकडे अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्यांनी आपली गुंतवणूक जगासमोर ठेवली. त्यांच्या या पारदर्शकेमुळे लाखो गुंतवणूकदारांचा फायदा झालाच. त्याच सोबत शेअर बाजार म्हणजे सट्टा ही चुकीची कल्पना मोडीत निघण्यासही मदत झाली. त्यांचे देशप्रेम हे त्यांच्या मुलाखतीतून वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या भाषणांमधून सातत्याने पुढे येत राहिलं. त्यांचा आणखी एक काहीसा अपरिचित गुण म्हणजे त्यांच्यातील दातृत्व .

रेअर इंटरप्राईजेस या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक जनहिताच्या कामांना आर्थिक पाठबळ दिले. जगण्याचा आनंद ते सातत्याने घेत राहिले आणि लोकांना तो घेण्यासाठी प्रेरित करत राहिले. भरपूर पैसे कमावणे किंवा भरपूर नफा कमवणे हा गुन्हा नाही. तो योग्य मार्गाने कमवला पाहिजे असे त्यांचे सतत सांगणं आहे. पेशाने एक चार्टर्ड अकाउंटंट असणारे राकेश झुनझुनवाला बाजाराच्या कायम स्मरणात राहतील ते याच कारणामुळे... 

राकेश झुनझुनवाला यांच्यामुळे मध्यमवर्गाला आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग चोखाळण्याची प्रेरणा मिळाली. सारा देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची तयारी करत असताना आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र घरोघरी नेणाऱ्या शिलेदारचं असं एकाएकी जाणं मनाला चटका लावून गेलं...