मुंबई : चीनमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका जगाला सर्वात आधी सांगणाऱ्या डॉक्टरचा कोरोना व्हायरसमुळेच मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग असं या डॉक्टरचं नाव आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनेच ही माहीती दिली आहे. ३४ वर्षीय डॉ. ली वेनलियांग आणि इतर आठ जणांनी सर्वात आधी करोना सारखा भयानक विषाणू चीननमध्ये आला असून हा आजार जीवघेणा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, संपूर्ण चीनमध्ये पसरलेल्या या जीवघेण्या आजाराचे वेनलियांगही बळी ठरले आहेत.
डॉक्टर ली वेनलियांग यांनी सर्वात प्रथम कोरोना व्हायरसचा इशारा दिला होता. तेव्हा पोलिसांनी डॉक्टर ली यांना गप्प राहण्याचा इशारा दिला. मात्र डॉक्टर ली शांत राहिले नाहीत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट जगासमोर मांडली.
डॉक्टर ली हे वुहान सेंट्रल रूग्णालयात कार्यरत होते. 30 डिसेंबर रोजी डॉक्टर ली यांनी काही डॉक्टरांशी एका व्हायरसबद्दल चर्चा केली होती. मात्र तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की, हा व्हायरस कोरोना व्हायरस आहे. वीबोवर लिहिलेल्या पोस्टवर डॉक्टर ली यांनी सविस्तर माहिती दिली होती. 10 जानेवारी रोजी डॉक्टर ली यांना खोकला झाला. त्यानंतर ताप आला. दोन दिवसांत त्यांची तब्बेत इतकी बिघडली की त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. एवढंच नव्हे त्यांचे आईवडिल देखील आजारी पडले. त्यांना देखील रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर 20 जानेवारी रोजी 10 दिवसांनी चीनमध्ये कोरोना व्हायरसची घोषणा करण्यात आली. डॉक्टर ली यांच म्हणणं आहे की, अनेकदा त्यांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली मात्र ती निगेटीव आली. पण अखेर कोरोना व्हायरसने डॉक्टर ली यांना देखील आपल्या जाळ्यात ओढलं आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.