Traffic Jam News : प्रवासासाठी कुठंही निघालं असता रस्ते मोकळे मिळतील त्याच वेळात शक्य तितका प्रवास उरकण्याचा अनेकांचा बेत असतो. कारण, प्रवासादरम्यान एकदा का थांबत राहण्याची सुरुवात झाली, की अजाणतेपणे हा प्रवास लांबत जातो आणि मग प्रवासाचतील उत्साह विरून जातो. मागील काही वर्षांमध्ये खासगी वाहनांची वाढती संख्या जगातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येला वाव देताना दिसत आहे.
मुख्य रस्तेच नव्हे, तर गल्लीबोळातही लहान वाहनं आल्यामुळं नजर जाईल तिथं वाहनांचीच गर्दी पाहायला मिळते. अशा एखाद्या वाहतूक कोंडीत बरेचजण अडकले असतील. साधारण अर्धा तास, फारफारतर एकदीडतास.... पण तुम्ही तब्बल 12 दिवसांपर्यंत चालणारी वाहतू कोंडी अर्थात traffic jam कधी पाहिलंय?
चीनमधील बीजिंग येथे असणाऱ्या बीजिंग-तिबेट एक्सप्रेस वे (China National Highway 110) वर जवळपास 100 किमी आणि त्याहूनही अधिक अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही परिस्थिती इतकी वाईट होती, की हा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम असल्याचं सांगण्यात आलं. 14 ऑगस्ट 2010 मध्ये या महामार्गावर हे चित्र पाहायला मिळालं होतं. ही वाहतूक कोंडी इतक्या वाईट वळणावर पोहोचली होती की, इथं 12 दिवसांपर्यंत वाहनं एकाच ठिकाणी अडकून पडली होती.
बीजिंगमध्ये असणाऱ्या तिबेट एक्स्प्रेस वे इथं रस्ते दुरुस्तीचं काम सुरु होती. ज्यामुळं वाहतूक एकाच मार्गानं वळवण्यात आली होती. जी अवजड वाहनं मंगोलियाहून बीजिंगपर्यंत बांधकाम साहित्य नेत होती त्यांच्यामुळं बीजिंगबाहेर येण्याचे मार्ग बंद झाले होते. पाहता पाहता ही वाहतूक कोंडी इतकी वाढली की परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आणि इथं पाहायला मिळालं जगातील सर्वात मोठं ट्रॅफिक जॅम.
चीनमध्ये उदभवलेली ही परिस्थिती इतकी वाईट होती की, स्थानिकांना चालण्यासाठीही जागा नव्हती. काहींनी इथं 12 दिवस वाहनं उभी ठेवली, तर काहीजण आठवडाभर इथं अडकले होते. अनेक वाहनचालकांनी इथंच वाहनांमध्ये वास्तव्य करत काहींनी वाहनांनाच घराचं रुप दिलं होतं. काही वाहनांमध्ये जेवण बनवण्याचाही घाट घातला गेला. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या सामानाच्या किमती पाहता पाहता इतक्या वाढल्या की, अनेकांनी लहानसहान गोष्टींसाठी दहापट अधिक रक्कम मोजली होती. इथं अडकलेल्यांकडे वाहतूक कोंडी सुटण्याची वाट पाहण्यावाचून आणखी कोणताही पर्याय उरला नव्हता.