Woman Bought 3 Houses In Rs 270: स्वत:च्या मालकीचं एखादं घर (Buying Home) असावं असं आपल्यापैकी प्रत्येकाचं स्वप्न असतं. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये तर स्वत:चं घर उभं करण्यामध्येच सर्वसामान्य व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य खर्च होतं. मध्यमवर्गीय लोकांना कर्ज काढल्याशिवाय स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करताच येत नाही असंही म्हटलं जातं. अर्थात भारतामधील मेट्रो शहरं आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये घरांच्या वाढलेल्या किंमती यासाठी कारणीभूत आहेत. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकेतील एका महिलेने इटलीमध्ये अवघ्या 90 रुपये प्रती घर या सरासरीने 270 रुपयांमध्ये 3 घरं एकाच वेळेस विकत घेतली आहेत. इटलीमधील दुर्गम भागांमध्ये अनेक ठिकाणी घरं अगदी कवडीमोल दरात विकली जात आहेत. या गावामधील घरं कोणीच वापरत नाही. त्यामुळेच इतक्या कमी किंमतीत ही घरं विकली जात आहेत.
49 वर्षीय रुबिका डॅनिएल यांनी खरं तर ही इटलीमधील 3 घरं 2019 साली विकत घेतली होती. आता त्यांनी या घरांचं काम हाती घेतलं आहे. डॅनिएल या सौरऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहेत. इटली देशातील अनेक शहरांमधून लोक स्थलांतरित झाले असून ही शहर ओसाड पडली आहेत. याच शहरांमध्ये लोकांनी पुन्हा राहयला यावं या हेतूने अगदी स्वस्तात घरं विक्रीसाठी काढली असल्याचं डॅनिएल यांनी कुठेतरी वाचलं आणि त्यांनी घरं विकत घेण्याचं ठरवलं. इनसायडरला दिलेल्या माहितीमध्ये डॅनिएल यांनी, "मला आश्चर्य वाटलं. पण खरोखरच इतक्या कमी किंमतीत घरं विकली जात आहेत का हे तपासून पहाणं गरजेचं आहे. मी सखोल संशोधन केलं. त्यानंतर 3 दिवसांमध्ये मी विमानाचं तिकीट, भाड्याने घेतलेली कार, हॉटेल बुकींग करुन इटलीला गेले," असं सांगितलं. डॅनिएल मुसोमेली शहरात पोहचल्या. त्यानंतर तिथून त्या इटलीच्या मुख्य भूमीपासून काही अंतरावर असलेल्या सिसिली बेटावरील घरं पाहण्यासाठी गेल्या. तिथेच त्यांनी ही 3 घरं विकत घेतली. ही घरं त्यांना अमेरिकन चलनानुसार 3.30 डॉलर्सला पडली.
अशाच एका सैंबुसा शहरामधील लोकसंख्या मागील काही कालावधीपासून झपाट्याने कमी होत आहे. येथे जेवढी घरं आहेत तितके लोकही येथे राहत नाहीत अशी सध्या परिस्थिती आहेत. त्यामुळेच अनेकजण येथील आपल्या पूर्वजांची संपत्ती कवडीमोल दरात विकत आहेत. हे शहर इटलीच्या मुख्य भूमीपासून काही अंतरावर असलेल्या बेटांवर वसलेलं आहे. त्यामुळे या या घरांमधून सुंदर समुद्रकिनारे दिसतात. मागील अनेक वर्षांपासून इटलीमध्ये स्वस्त घरांचा हा ट्रेण्ड दिसून येत आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक घरं ही परदेशी व्यक्तीच विकत घेत आहेत. या घरांच्या किंमती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. मात्र ही घरं म्हणजे एक लायबिलीटी असल्याचं स्थानिकांना वाटतं. कोणताही आर्थिक फायदा मिळून न देणाऱ्या जबाबदारीप्रमाणे ही घरं आहेत असं इथल्या स्थानिकांना वाटतं. म्हणून अगदी नाममात्र दरामध्ये ते ही घरं विकत आहेत. खरं तर ही घरं मोफतही देण्यास काहीजण तयार आहेत. मात्र व्यवहार झाल्याचं दर्शवण्यासाठी अगदीच नाममात्र किंमत या घरांसाठी आकरली जाते असं काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे.
या घरांचे मालक परदेशांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी बराच खर्च या मालकांना करावा लागतो. तसेच या घरांची बरीच पडझड झाली आहे. त्यामुळे त्यांची डागडुजी करण्यासाठीही फार खर्च करावा लागेल. म्हणूनच एवढे उद्योग करण्याऐवजी हे मालक अगदी कमी किंमतीत ही घरं विकत आहेत. मात्र या घरांची डागडुजी करुन ती राहण्यासारखी करण्यासाठी अंदाजे 20 लाख ते 75 लाखांचा खर्च करावा लागतो.