इवांका ट्रम्पकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, पदावरुन हटवण्याची मागणी

नियम तोडणाऱ्या इवांका आणि तिच्या पतीवर टीका होतेय

Updated: Apr 19, 2020, 07:44 AM IST
इवांका ट्रम्पकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, पदावरुन हटवण्याची मागणी  title=

वॉशिंग्टन : न्यूझीलंडचे आरोग्य मंत्री डेविड क्लार्क यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून टीका झाली. यानंतर त्यांनी स्वत:ला मुर्ख देखील म्हटले होते. पण आता या व्हीव्हीआयपी यादीत आणखी एक नाव आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पने देखील असाच गंभीर प्रकार केला आहे. यहूदी सणावर पासोवरच्या निमित्ताने ती आपला पती जेरेड कुश्नर याच्यासहित बॅडमिस्टर येथील ट्रम्प यांच्या गोल्फ रिसॉर्टमध्ये गेली होती. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका झाली. कारण ती स्वत: देशाला लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. हा वाढता वाद पाहता व्हाईट हाऊस तिच्या मदतीला धावले आहे. हे लॉकडाऊन तोडणं कसे अयोग्य नव्हते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न होतोयं. पण सर्वसामान्य जनतेला हे पचवणे खूप कठीण जात आहे. पण त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय देखील नाही.

नियम तोडणाऱ्या इवांका आणि तिच्या पतीवर टीका होतेय. केवळ ती ट्रम्प यांची मुलगी असल्याने ही टीका नसून हे दोघेही व्हाइट हाऊसमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या दोघांना पदावरुन हटवण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत. ट्रम्प यांच्या विरोधकांनी देखील या प्रकरणावरुन निशाणा साधला आहे.