Trending News : मनाजोगी नोकरी मिळते तेव्हा आपल्याला झालेला आनंद शब्दातही व्यक्त करता येत नाही. कारण, याच नोकरीचं स्वप्न आपण अनेक वर्षांपासून पाहिलेलं असतं. किंबहुना याच स्वप्नपूर्तीच्या बळावर आपण सुखी आयुष्याचा डोलारा उभारण्याचं धाडस करत असतो. नोकरीच्या बाबतीतील हेच समीकरण सर्वांच्याच वाट्याला येईल असं नाही. किंबहुना येतही नाही.
आक्रस्ताळपणे वाद घालणारे वरिष्ठ, कमी पगाराची नोकरी, कामाचे न संपणारे तास या अशा विदारक परिस्थितीचा सामनाही अनेकजण करत असतात. त्यात संस्थेच्या धोरणांखाली येऊन अशा बऱ्याच कर्मचाऱ्यांची अवस्था उसाच्या चिपाडाप्रमाणं झालेली असते. जिथं भूक-तहान विसरून काम करा... अशाच अपेक्षा सातत्यानं केल्या जातात.
काही कंपन्या मात्र याला अपवाद ठरतात. कारण, त्यांना कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या योगदानाची जाणीव असते. अशाच कंपन्यांपैकी एका संस्थेतून कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या क्षणी त्याला एक छानशी आठवण देण्यात आली. शिवाय त्याच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम सदिच्छा भेट स्वरुपात देण्यात आली. पण, ती काही खास व्यक्तींकडून त्याला मिळालेली भेट होती.
अमेरिकेतील एका 'बर्गर' कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं आपल्या 27 वर्षांच्या कारकिर्दीत एकही सुट्टी न घेता सर्वांनाच थक्क केलं. बरं इतकंच नाही, तर या व्यक्तीसाठी सोशल मीडियावर अनेक मोहिमा चालवण्यात आल्या ज्यामुळं त्याला थेट 3 कोटींहून अधिक रुपये मिळणार आहेत.
'यूके डेली एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार अमेरिकेतील लास वेगास येथील ही घटना असून, तिथं Burger King मध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याला 'गोफंडमी कँपेन'अंतर्गत 3.67 कोटी रुपये म्हणजेच 4,50,000 डॉलर इतकी मोठी रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे. लोकनिधीतून ही मोठी रक्कम एकवटली असून, 54 वर्षीय केविन फोर्डसाठी हे सारंकाही एका स्वप्नाहून कमी नाही. केविनच्या लेकिनंच त्यांच्यासाठी ही मोहिम सुरु केली होती.
27 वर्षांपूर्वी मुलींचा ताबा मिळाल्यानंतर केविननं नोकरीची सुरुवात केली आणि एकही सुट्टी न घेता आपल्या वाट्याला आलेली ही नोकरी प्रामाणिकपणे बजावली. कंपनीच नव्हे, तर कुटुंबालाही त्यानं प्राधान्यस्थानी ठेवत या दोन्ही गोष्टींमध्ये सुरेख समतोल राखला. त्याच्या याच कष्टांचं चीज आता झालं असून, निवृत्तीनंतर एक सुखद अनुभव त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला असंच म्हणावं लागेल.