व्हिडिओ : पत्रकारानं स्वत:च्या लग्नात कव्हर केली 'ब्रेकिंग न्यूज'

एखाद्या न्यूज चॅनलच्या रिपोर्टरला 'ब्रेकिंग न्यूज'चं किती वेड असावं? त्याला काही मर्यादाच उरलेली नाही असंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणावसं वाटेल... 

Updated: Feb 5, 2018, 10:05 PM IST
व्हिडिओ : पत्रकारानं स्वत:च्या लग्नात कव्हर केली 'ब्रेकिंग न्यूज' title=

मुंबई : एखाद्या न्यूज चॅनलच्या रिपोर्टरला 'ब्रेकिंग न्यूज'चं किती वेड असावं? त्याला काही मर्यादाच उरलेली नाही असंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणावसं वाटेल... 

पाकिस्तानमध्येही असंच घडलंय. एका स्थानिक पत्रकारानं आपल्याच लग्नाची 'ब्रेकिंग न्यूज' केली... आणि तो काम करत असलेल्या टीव्ही चॅनलनं त्याची ही 'ब्रेकिंग न्यूज' टीव्हीवरही दाखवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

'सी ४१ चॅनल'नं याआधीही शहरातले असे काही लग्न आपल्या चॅनलवर दाखवले होते. त्यामुळे त्यांनी हे लग्नदेखील चॅनलवर दाखवण्याचा निर्णय घेतला. 

फैसलाबादच्या 'सी ४१ चॅनल'चे रिपोर्टर हनन बुखारी आपल्या लग्नात स्पोर्टस कार आणि महागड्या बाईकसहीत पोहचले होते. आपल्या सहकाऱ्याच्या हातातील माईक हातात घेऊन आपल्या लग्नाच्या लाईव्ह कव्हरेजची जबाबदारी हनन यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली... 'आज मी माझ्याच लग्नाच्या ठिकाणी उपस्थित आहे. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अत्यानंदाचा क्षण आहे. हे लव्ह मॅरेज असल्यानं माझी पत्नी आणि त्यांचं कुटुंबही आनंदी आहे' असं म्हणत त्यांनी आपल्या लग्नाचं वार्तांकन करण्यास सुरुवात केली. 

या कव्हरेजमध्ये त्यांनी आपल्या पत्नीलाही विचारलं 'आज तुमचं माझ्याशी लग्न होत आहे, तुम्हाला काय म्हणायचंय?' यावर त्यांच्या नववधून नजर वर न उचलता 'खूप आनंदी' असल्याचं सांगितलं. त्यावर नवरदेव जरा नाखुश होत म्हणाले... 'पाहा, मी इतका खर्च केलाय... स्पोर्टस कार आणि बाईक घेऊन आलोय, सगळं शहर मला पाहतंय, पण या मात्र माझ्याकडे पाहतदेखील नाहीत'.

हनन बुखारी यांच्या लग्नाच्या कव्हरेजचा लाईव्ह व्हिडिओ थोड्याच वेळात इंटरनेटवर व्हायरल झाला नसता तरच नवल.... त्यावर अनेक उलट-सुलट चर्चाही झाल्या. पण, हा किस्सा मात्र अनेकांचं लक्ष वेधून घेणारा ठरला.