मुंबई : 'रशियन गुप्तहेर' म्हणून ज्याच्यावर आरोप करण्यात आला होता तोच पांढऱ्या रंगाचा व्हेल मासा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हा व्हेल मासा महिलेच्या मदतीसाठी धावून आल्याचं एका व्हिडिओतून दिसतंय. या व्हेल माशाच्या मदतीनं एका महिलेला आपला समुद्रात पडलेला आयफोन परत मिळाला.
हॅमरफेस्ट हार्बर इथला हा व्हिडिओ आहे. नॉर्वेतील स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं नाव इना मनसिका असं आहे. ही महिला आपल्या मित्र-मंडळींसोबत समुद्रात बोटिंगचा आनंद घेत असताना तिचा आयफोन तिच्या हातातून निसटला आणि खोल समुद्राच्या पाण्यात हरवून गेला.
थोड्याच वेळात समुद्रातून एक पांढऱ्या रंगाचा व्हेल मासा वर येताना दिसला... आणि महत्त्वाचं म्हणजे, त्याच्या तोंडात इनाचा आयफोनदेखील होता. इनानं हात पुढे करत व्हेल माशाच्या तोंडातील आयफोन काढून घेतला.
बराच वेळ पाण्यात राहिल्यानं इनाचा आयफोन आता निकामी झालाय. पण या व्हेल माशाचं कौतुक करताना मात्र ती थकत नाही.
उल्लेखनीय म्हणजे, या पांढऱ्या रंगाच्या व्हेल माशावर रशियाचा गुप्तहेर असल्याचा आरोप झाला होता. बेल्युगा प्रजातिच्या या व्हेल माशाच्या तोंडावर हार्नेस (खास पट्टा) लावण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं लक्षात आलं. त्यानंतर या व्हेल माशाला खास ट्रेनिंग देऊन गुप्तहेरी करण्यासाठी समुद्रात तैनात करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.