'रॉयल बेबी'वर कमेंट करणं निवेदकाला पडलं भलतंच महागात!

डॅनी बेकर यांच्यावर 'डचेस ऑफ ससेक्स'वर वर्णभेद करणारी टीप्पणी केल्याचा आरोप

Updated: May 10, 2019, 02:05 PM IST
'रॉयल बेबी'वर कमेंट करणं निवेदकाला पडलं भलतंच महागात! title=

लंडन : ब्रिटनच्या राजघराण्याचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या घरात एका चिमुकल्याचा जन्म झाला. सगळ्या जगातून या शाही जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. परंतु, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) एका रेडिओ निवेदकाला मात्र 'रॉयल बेबी'वर कमेंट करणं भलतंच महागात पडलं. बीबीसीनं निवेदक डॅनी बेकर याला प्रिन्स हॅरी, मेगन मार्कल आणि त्यांच्या नवजात पुत्र 'आर्ची'वर केलेल्या वादग्रस्त ट्विटवरून त्याला नोकरीतून काढून टाकलंय.

वर्णभेदी ट्विट

डॅनी बेकर यानं केलेलं हे ट्विट आता मात्र सोशल मीडियातून त्यानं डीलिट केलंय. बेकर यानं ट्विट केलेल्या एका ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोत दोन लोक एका लहानग्या वनमानुषाचा हात पकडून एका दरवाजातून बाहेर येताना दिसत आहेत. वनमानुषानं या फोटोत सूट-बूट परिधान केलेला दिसतोय. 'रॉयल बेबी हॉस्पीटलमधून बाहेर पडताना' असं म्हणत बेकरनं हा फोटो शेअर केला होता.


डॅनी बेकर यांचं वादग्रस्त ट्विट 

बेकर यांच्यावर कारवाई 

त्यानंतर ६१ वर्षीय डॅनी बेकर यांच्यावर 'डचेस ऑफ ससेक्स'वर वर्णभेद करणारी टीप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला. 'ही एक गंभीर चूक होती. बेकर यांचं ट्विट आमच्या संस्थेनं आत्मसात केलेल्या मूल्यांच्या विरुद्ध होतं' असं बीबीसीच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. डॅनी एक योग्य निवेदक आहेत, परंतु यापुढे मात्र ते आमचा साप्ताहिक कार्यक्रम सादर करू शकणार नाहीत, असं सांगत बेकरवर कारवाई केल्याचंही प्रवक्त्यांनी जाहीर केलं.

डॅनी बेकर यांचा माफीनामा

सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागलेल्या डॅनी बेकर यांनी आपली चूक मान्य करत सगळ्यांची माफी मागितली. परंतु, हा फोटो शेअर करण्यामागे आपल्या भावना कुणालाही दुखावण्याच्या नव्हत्या, असं काही होईल याची आपल्याला कल्पना नव्हती... आपलं ट्विट चुकीच्या पद्धतीनं घेतलं गेल्याची भावना बेकर यांनी व्यक्त केली.