ब्युरो रिपोर्ट : भारताच्या बहुतांशी भागात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या अमेरिका, ब्रिटनसह महत्वाच्या देशांतही एप्रिल अखेरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. दुसरीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या चीनमध्येही या विषाणुने पुन्हा डोके वर काढले असून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
अमेरिकेत मृतांचा आकडा २२ हजारापर्यंत पोहचला आहे आणि गेले चार दिवस दररोज सुमारे २००० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत अशी विदारक स्थिती असली तरी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवून १ मेपासून व्यवहार सुरळीत करण्याचा विचार ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केला. पण १ मे रोजी लॉकडाऊन उठवता येईल का हे आत्ताच सांगणं कठीण आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आर्थिक संकटही वाढलं असून बेकारी भत्त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या आता दीड कोटींवर गेली आहे.
ब्रिटनमध्येही आणखी तीन आठवडे लॉकडाऊन वाढवलं जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेरही कोरोनाचा विपरित परिणाम झाला असून एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी तब्बल २५ ते ३० टक्के घटण्याची शक्यता ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी वर्तवली आहे. ब्रिटनमध्ये १० हजार ६०० हून अधिक जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं चित्र गेले काही दिवस पाहायला मिळालं होतं. पण चीनच्या रशियन सीमेवरील भागात आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये गेल्या पाच आठवड्यात कमी झालेल्या रुग्णसंख्येचं प्रमाण रविवारी अचानक वाढलं. शनिवारी चीनमध्ये ९९ रुग्ण आढळले होते तर रविवारी आणखी १०८ रुग्ण आढळले. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३३४१ बळी गेले आहेत. रविवारी चीनमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. चीनमध्ये आतापर्यंत ८२ हजार १६० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे झाले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा कहर झाला होता. आता वुहान शहरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी रशियाच्या सीमेवरील चीनच्या शहरांत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.