अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; मॉलमध्ये घुसून आरोपीने केली 9 जणांची हत्या

Crime News : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी टेक्सासमधील अॅलन प्रिमियम आउटलेट्स मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार तर सात जखमी झाले आहेत

आकाश नेटके | Updated: May 7, 2023, 01:03 PM IST
अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; मॉलमध्ये घुसून आरोपीने केली 9 जणांची हत्या title=
(फोटो सौजन्य -AP)

Crime News : अंधाधुंद गोळीबाराच्या घटनेने अमेरिका (US) पुन्हा एकदा हादरली आहे. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटनेने नऊ लोकांचा बळी घेतला आहे. टेक्सासच्या (Texas) अॅलन भागातील मॉलमध्ये एका व्यक्तीने (gunman) अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. डॅलसच्या उत्तरेकडील एका मॉलमध्ये शनिवारी एका बंदुकधारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर आरोपीला पोलिसांनी ठार केले आहे.

टेक्सासमधील अॅलन प्रिमियम आउटलेट्स मॉलमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी 3.40 च्या सुमारास ही धक्कादाय घटना घडली. या गोळीबारात अनेक लोक मारले गेल्याचे येथे उपस्थित लोकांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितले. अनेक लहान मुलेही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय मॉलमधील सुरक्षा रक्षक आणि एक पोलीस कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर मॉलमधील लोक आणि दुकानदार जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले होते.

आरोपीने मॉलच्या बाहेर गोळीबार सुरू केल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला ठार मारले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अॅलन अग्निशमन विभागाचे प्रमुख जॉन बॉयड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की त्यांच्या विभागाने किमान नऊ मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना रुग्णालयात नेले आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये लोक शॉपिंग मॉलसमोरील पार्किंगमधून पळताना दिसत आहेत. पाठीमागे गोळीबाराचा मोठा आवाज ऐकू येत आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार, एक माणूस मॉलमधून बाहेर पडतो आणि त्यानंतर फुटपाथवर गोळीबार सुरू करतो. तिथल्याचे एका व्यक्तीने सांगितले की, मी कानात हेडफोन घातले होते पण तरीही मला गोळीबाराचा स्पष्ट आवाज ऐकू आला. त्यानंतर तिथे चप्पल आणि रक्ताने माखलेले लोक पडलेले दिसले. खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या आणि सगळीकडे रक्ताच्या थारोळ्या पडलेले लोक दिसत होते.

स्थानिक पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेनंतर लोकांना त्या भागात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही. पोलीस विभागाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, गस्त घालत असताना पोलिसांना मॉलमध्ये गोळीबाराचा आवाज आला. यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गोळीबार करणाराही मारला गेला आहे. तो एकटाच गोळीबार करत होता. त्याच्यासोबत दुसरे कोणी नव्हते. गोळीबार सुरू असताना लोकांनी बाहेर धाव घेतली आणि शेकडो लोक मॉलबाहेर जमा झाले.

दरम्यान, अमेरिकेमध्ये अशा गोळीबाराच्या घटना सामान्य झाल्या आहेत. 2023 मध्ये आतापर्यंत किमान 198 घडल्याचे समोर आले आहे. 2016 पासून या वर्षातील सर्वात जास्त गोळीबाराच्या घटना झाल्याचे समोर आले आहे.