अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा दणका

वेळोवेळी अमेरिकेची ही भूमिका पाहता... 

Updated: Mar 6, 2019, 10:20 AM IST
अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा दणका title=

नवी दिल्ली : अमेरिकेकडून पाकिस्तानी नागरिकांना एक मोठा दणका देण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेकडून देण्यात य़ेणाऱ्या व्हिसाच्या मुदतीत आता मोठी घट करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दूतावासाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाख्या व्हिसाची मुदत ही पाच वर्षांवरुन आता थेट अवघे तीन महिने करण्यात आली आहे. दूतावासाच्या प्रवक्त्यांचा हवाला देत एआरवायकडून याविषयीचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. अमेरिकेकडून घेण्यात आलेला हा निर्णय पाहता पाकिस्तानला मोठा धक्काच बसल्याचं प्रतित होत आहे. 

दहशतवादी कारवाया आणि संघटनांना पाकिस्तानचा असणारा पाठिंबा पाहता त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय संघटनांचा दबाव वाढत आहे. शिवाय अनेक राष्ट्रांनी पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा न देण्याविषयीची ताकिद दिल्यामुळे जागतिक पातळीवरही त्यांची अनेक मार्गांनी कोंडी केली आहे. त्यातच आता ट्रम्प सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाविषयी घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ. या निर्णयाआधी पाकिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेकडून पाच वर्षाच्या कालावधीसाठीचा व्हिसा देण्यात येत होता. पण, यापुढे मात्र ही मुदत अवघे तीन महिने करण्यात आली आहे. 

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून भारतात घडवून आणण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्याचा अमेरिकेने तीव्र शब्दांत निषेध केला होता. त्यानंतर या हल्ल्याचं उत्तर म्हणून भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईकचं त्यांच्याकडून समर्थन करण्यात आलं होतं. इतकच नव्हे, तर दहशतवादी संघटनांना आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत करणं थांबवावं अशी ताकिदही अमेरिकेने पाकिस्तनला दिली होती. अमेरिकेची या सर्व प्रकरणात असणारी एकंदर भूमिका पाहता प्रत्येक वेळी पाकिस्तानला दणका मिळाल्याचच स्पष्ट होत आहे.