वॉशिंग्टन : अमेरिकेने सीरियावर हवाई हल्ले केलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सीरियावर हे हवाई हल्ले करण्यात आलेत. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्तरित्या ही कारवाई केलीय. ड्रौमा शहरात सीरियाकडून रासायनिक हल्ले करण्यात आले होते. या रासायनिक हल्ल्यात लहान मुलांसह ७४ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर अमेरिकेने सीरियातील असद सरकारला इशारा दिला होता. अशाप्रकारे मानवाधिकारांचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही अशा शब्दांत अमेरिकेने ठणकावलं होतं. या घटनेनंतर अमेरिकेने सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांची जनावर अशी संभावना केली होती.
सीरियाच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर केलाय. तसंच हल्ल्यासाठी बॉम्बचाही वापर होत आहे, अशी माहिती अमेरिका अधिकाऱ्यांनी दिलेय. तर दुसरीतडे, रशियानेही अमेरिकेला मिसाइल हल्ला करु,अशी धमकी दिलेय. त्यामुळे तिसऱ्या युद्धाचे काळे ढग जगावर घोंघावत असल्याचे दिसून येत आहेत.
सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याचा लक्ष्य बनवून हल्ले सुरु करावेत, असे आदेश आम्ही सैन्याला दिले आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सीरिया प्रश्नी देशाला संबोधित करताना सांगितले. 'फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे. यासाठी दोन्ही देशांचे मी आभार मानतो, असे उद्गगार ट्रम्प यांनी काढले.