ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट अटळ? पंतप्रधानांकडून पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत

जागतिक आकडेवारीची तुलना केल्यास कोरोना मृतांच्या क्रमवारीत अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको यांच्यानंतर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर आहे. 

Updated: Sep 19, 2020, 09:00 AM IST
ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट अटळ? पंतप्रधानांकडून पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत title=

लंडन: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट येणार, ही गोष्ट अटळ आहे. आम्हाला आणखी एकदा देशव्यापी लॉकडाऊन करायचा नाही. मात्र, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशात काही नवे निर्बंध लागू करावे लागतील, असे वक्तव्य ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले. ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता बोलून दाखविली. गेल्या काही दिवसांत इंग्लंडच्या उत्तर भागात आणि लंडनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरदिवशी सापडणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट होऊन सहा हजारांवर जाऊन पोहोचला आहे. तसेच रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या संभाव्य कोरोनाग्रस्तांचे प्रमाणही वाढले आहे. ही सर्व परिस्थिती कोरोनाची दुसरी लाट येण्याचे लक्षण आहे. किंबहुना ती अटळ आहे, अशी भीती बोरिस जॉन्सन यांनी वर्तविली. 

त्यासाठी आता संपूर्ण देश पुन्हा लॉकडाऊन करणार का स्थानिक पातळीवरच निर्बंध लादणार, असा प्रश्न बोरिस जॉन्सन यांना विचारण्यात आला. त्यावर जॉन्सन यांनी म्हटले की, मला पुन्हा एकदा देश लॉकडाऊन करायचा नाही. परंतु, जॉन्सन यांनी देशव्यापी निर्बंधांची शक्यताही नाकारली नाही. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. 

याशिवाय, बोरिस जॉन्सन यांनी सध्या ब्रिटनमध्ये लागू असलेले 'रुल ऑफ सिक्स' या नियमाचाही पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सध्या ब्रिटनमध्ये सार्वजनिक ठिकाणी सहा लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला यापुढे जाऊन निर्बंध लादण्याची गरज असल्याचे मत बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केले. 

जागतिक आकडेवारीची तुलना केल्यास कोरोना मृतांच्या क्रमवारीत अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको यांच्यानंतर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर आहे. ८ मे नंतर शुक्रवारी ब्रिटनमध्ये पहिल्यांदाचा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यादृष्टीने आता ब्रिटनमधील आरोग्ययंत्रणा सतर्क झाल्या आहेत.