युक्रेन बनवत होता 'डर्टी बॉम्ब' ? रशियाचा झेलेन्स्कींवर मोठा आरोप

काय आहे हा डर्टी बॉम्ब, का केला आहे रशियाने युक्रेनवर गंभीर आरोप, वाचा

Updated: Mar 6, 2022, 09:01 PM IST
युक्रेन बनवत होता 'डर्टी बॉम्ब' ? रशियाचा झेलेन्स्कींवर मोठा आरोप title=

Russia Ukrain War : युक्रेन प्लुटोनियमवर आधारित डर्टी बॉम्ब तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप आता रशियानं केलाय. चेर्नोबिलच्या अणूभट्टीमध्ये युक्रेन हे घातक अण्वस्त्र तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. 2000 साली झालेल्या अपघातामुळे हा प्लांट बंद करावा लागला होता. मात्र त्यानंतरही तिथं डर्टी बॉम्ब तयार करण्यात येत असल्याचा दावा रशियानं केलाय. रशियातील वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीसाठी कोणताही पुरावा मात्र देण्यात आलेला नाही. 

काय आहे हा डर्टी बॉम्ब?
किरणोत्सारी पदार्थ आणि RDX सारखी स्फोटकं वापरून हा डर्टी बॉम्ब तयार केला जातो.  एक स्फोट करून किरणोत्सारी पदार्थ हवेत सोडले जातात.  प्रत्यक्षात स्फोट छोटा असल्यानं त्यातून फार मोठं नुकसान होत नाही.  मात्र त्यामुळे हवेत परसलेल्या किरणोत्सारी पदार्थाचे दूरगामी परिणाम लोकांवर होऊ शकतात.  आतापर्यंत जगात कुठेही या डर्टी बॉम्बचा वापर झाल्याचा पुरावा नाही. 

युक्रेनने फेटाळला आरोप
अर्थात, हा आरोप युक्रेननं फेटाळून लावलाय. 1994 साली सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर युक्रेननं अण्वस्त्राचा त्याग केलाय आणि पुन्हा न्यूक्लिअर क्लबमध्ये सामिल होण्याची देशाची कोणतीही मनिषा नाही, असं राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलंय. 

युद्धामध्ये सैन्याइतकंच प्रभावी ठरतं ते प्रचारतंत्र. सध्या रशिया, युक्रेन आणि युरोपियन युनियनकडून या तंत्राचा पुरेपूर वापर केला जातोय. रशियाचा 'डर्टी बॉम्ब'चा आरोप याच प्रचारतंत्राचा एक भाग आहे.