कीव : Russia Ukraine War : युद्धाच्या सहाव्या दिवशीही युक्रेनकडून रशियाला कडवा प्रतिकार केला जातोय. युक्रेनच्या सैन्याने पुन्हा एकदा रशियाची मिसाईल सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कीव शहाराच्या उत्तरेकडील गावातील असल्याचे सांगितले जात आहे. (Ukraine attacks Russia, destroys Russia's missile system)
रशिया-युक्रेन युद्धाचा सहावा दिवस आहे. रशियन फौजांनी युक्रेनच्या शहरांमध्ये हाहाकार माजवला आहे. मात्र युक्रेनने रशियन आर्मीला जशास तसे उत्तर दिले आहे. युक्रेनचे एक ब्रह्मास्त्र रशियावर भारी पडले आहे.
एकीकडे रशियन आर्मीने युक्रेनमध्ये धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे युक्रेनच्या सैन्यानेही सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या सैन्याने 3500 रशियन सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा युक्रेन आर्मीने केला आहे. इतकच नाही तर रशियाची 14 लढावू विमाने, 8 हेलिकॉप्टर्स, 150हून अधिक रणगाडे आणि 536 लढावू वाहने नष्ट केल्याचाही दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे.
या युद्धात युक्रेनच्या मदतीला धावून आलाय तुर्कस्तानचा लढावू ड्रोन, ज्याचं नाव आहे बेयरेकतार टीबी-2. या ड्रोनने रशियन आर्मीला इंधन पुरवठा करणारी अख्खी ट्रेनच उडवून दिली आहे. खार्कीव्हमधील रशियन आर्मीचा तंबूही या ड्रोनने उखडला, असा दावा युक्रेनकडून करण्यात येतोय.
हा ड्रोन एअर डिफेन्स सिस्टमला सहजपणे चकवा देऊ शकतो. तो 18 हजार फूट उंचीपर्यंत 225 कि.मी.प्रतितास वेगाने उडू शकतो. या ड्रोनद्वारे 4 स्मार्ट मिसाईल किंवा 330 पाऊंड स्फोटके नेता येऊ शकतात. त्याची लांबी 39 फुट असून रूंदी 21 फुट इतकी आहे. या ड्रोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो सहजपणे शत्रूचे रणगाडे आणि एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करू शकतो. शिवाय आकाशातून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हे ड्रोन उपयुक्त आहेत.
सध्याच्या घडीला रशियाने युक्रेनमध्ये 2840 रणगाडे उतरवले आहेत. मात्र युक्रेनच्या ताफ्यातील तुर्की बनावटीचा अत्याधुनिक ड्रोन या रणगाड्यांनाही भारी पडताना दिसतोय. अजरबैजान-अर्मेनिया युद्धातही टीबी-2ने कमाल दाखवली होती. त्यामुळे शत्रू दुबळा असला तरी टीबी-2ला रोखण्याचं मोठं आव्हान रशियन आर्मीसमोर असणारे आहे.