Turkey Syria Earthquake: भूकंपातील मृतांचा आकडा 19 हजारांच्या पुढे, कडाक्याच्या थंडीत पिण्याचं पाणी मिळेना, लोकांचे हाल

Turkey Earthquake News: तुर्की आणि सीरियातील (Turkey Syria Earthquake) भूकंपामधील मृतांचा आकडा 19 हजाराच्या पुढे गेला आहे. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. मात्र मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फक्त तुर्कीत 14 हजार लोकांचा मृत्यू झाला असून 63 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.   

Updated: Feb 9, 2023, 09:28 PM IST
Turkey Syria Earthquake: भूकंपातील मृतांचा आकडा 19 हजारांच्या पुढे, कडाक्याच्या थंडीत पिण्याचं पाणी मिळेना, लोकांचे हाल title=

Turkey Earthquake News: तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपानंतर (Earthquake in Turkey and Syria) दोन्ही देशांमध्ये अद्यापही बचावकार्य सुरु असून लोकांना मलब्याखालून काढलं जात आहे. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड जीवितहानी झालेली असून मृतांची संख्या 19 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तुर्की आणि सीरियामधील भूकंपाच्या तीन दिवसांनी बेघर झालेले हजारो लोक मदतीसाठी उभारण्यात आलेल्या एका छावणीजवळ येऊन कडाक्याच्या थंडीत जेवण आणि पाण्यासाठी घोषणा देऊ लागले. 

दरम्यान, आज बचावकार्यादरम्यान मलब्याखाली मृत्यू आणि जीवनाशी झुंज देणाऱ्या अनेकांना वाचवण्यात य़श आलं आहे. तुर्कीमधील अंताल्या (antalya) शहरात रात्रभर काम करणाऱ्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी हजल गुनेर नावाच्या मुलीला आणि तिचे वडील  सोनर गुनेर यांना इमारतीच्या मलब्यातून बाहेर काढत जीव वाचवला.

सोनेर यांना रुग्णवाहिकेकडे नेलं जात असताना त्यांना बचावकार्यात सहभागी कर्मचाऱ्यांनी तुमची मुलगी जिवंत असल्याचं सांगितलं. तसंच तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं. यावर सोनेर यांनी त्यांचे आभार मानताना मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो अशी भावना व्यक्त केली. दुसरीकडे याच शहरात मदतीचं वाटप करण्यासाठी ट्रक पोहोचला असता लोकांनी गर्दी केली होती. या ट्रकमध्ये लहान मुलांसाठी कोट तसंच इतर सामान होतं. 
 
दरम्यान अंताल्याच्या पूर्वेकडील शहरात एका जखमी महिलेला सकाळी कोसळलेल्या इमारतीतून जिवंत बाहेर काढण्यात आलं. महिलेच्या शेजारी असणारे तीन लोक मात्र ढिगाऱ्याखाली मृतावस्थेत सापडले.

दरम्यान, भूकंपानंतर बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या उत्तर-पश्चिम सीरियात गुरुवारी सकाळी संयुक्त राष्ट्राचा एक मदत ट्रक तुर्कीमध्ये पोहोचला. भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. 

भूकंपानंतर सरकारकडून अत्यंत धीम्या गतीने प्रतिक्रिया दिली जात असल्याने टीका होत असताना राष्ट्राध्यक्ष Recep Tayyip Erdoğan गुरुवारी भूकंपग्रस्त प्रांतांना भेट देणार आहेत. 

सीरियात 3100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 5 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीमध्ये 1 लाखाहून अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. अलेप्पो या सीरियन सरकारच्या ताब्यात असलेल्या शहरात, बचावकर्त्यांनी गुरुवारी शहरातील एका कोसळलेल्या इमारतीतून सात लोकांना जिवंत बाहेर काढले आणि 44 मृतदेह बाहेर काढले, अशी माहिती सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे.