Turkey Earthquake Live Video: तुर्कीमध्ये भूकंपाने (Turkey Earthquake) हाहाकार माजवला आहे. तुर्की आणि सीरियात (Syria) भूकंपामुळे तब्बल 5000 हून जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. तुर्कीमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळत असल्याने रस्त्यावरुन चालतानाही लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. त्यातच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये रिपोर्टर भूकंपाचं लाईव्ह कव्हरेज (Live Coverage) करत असतानाच इमारत कोसळली (Building Collapse) आहे.
Yuksel Akalan हा रिपोर्टर भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ठिकाणांपैकी एक असणाऱ्या Malatya येथे लाईव्ह कव्हरेज करत होता. A Haber या चॅनेलसाठी कव्हरेज करत असताना भूकंप किती तीव्र आहे हे दाखवत रिपोर्टर तेथील सर्व इमारती दाखवत होता. रिपोर्टर लाईव्ह असतानाच तिथे रस्त्यावर उभे असणारे काही लोक त्याच्या दिशेने धावण्यास सुरुवात करतात.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अलार्म वाजल्यानंतर लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी धावत असल्याचं दिसत आहे. यावेळी गर्दीतील एक व्यक्ती रिपोर्टरलाही सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगताना दिसत आहे. यानंतर काही सेकंदातच लोकांचा आणि इमारत कोसळतानाचा आवाज ऐकू येत आहे. जेव्हा कॅमेरामन पुन्हा एकदा ते घटनास्थळ दाखवतो तेव्हा तिथे फक्त धूळ उडताना दिसत आहे. हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला असून तो पाहताना अंगावर काटा येतो.
A reporter on TV runs away from a collapsing building. This was in Turkey. pic.twitter.com/c18896Aouc
— ___pete (@rear_flank) February 6, 2023
Yuksel Akalan यांच्याशी Reuters ने संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की "आम्ही बचावकार्य दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. यावेळी मोठा आवाज झाला आणि आमच्या डाव्या बाजूला असणारी इमारत जमीनदोस्त झाली. तिथे मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं होतं".
तुर्कीला सोमवारी 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा फटका बसला. तुर्कीसह शेजारी राष्ट्रांनाही हे धक्के जाणवले आहेत. तुर्कीमध्ये बचावकार्य सुरु असतानाच आणखी काही धक्केही जाणवले आहेत. 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असताना हा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने 2 कोटी 30 लाख लोकांना भूकंपाचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.
सोमवारी देशात आलेला भूकंप हा गेल्या दशकातील सर्वात मोठं नैसर्गिक संकट असल्याचं राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. तुर्कीत आलेला पहिला भूकंप हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप होता. 12 तासांनंतर, 7.5 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू Kahramanmaras प्रांतातील Elbistan जिल्ह्यात होता.