Crime News: अमेरिकेत तीन तरुणींची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. Ecuador येथील बीचवर त्यांची हत्या करण्यात आली. मॅशिअस (21), टॅपिया (22) आणि रेयना (19) अशी त्यांची नावं आहेत. गळा कापल्यानंतर त्यांना पुरण्यात आलं होतं. 4 एप्रिलला या महिला बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर चार दिवसांनी त्यांचे मृतदेह आढळले आहेत. दरम्यान हत्येच्या आधी दोन तरुणींनी आपल्या जवळच्या व्यक्तींना मेसेज पाठवत धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. 'मला वाटतं काहीतरी होणार आहे', असं त्यांनी या मेसेजमध्ये लिहिलं होतं असं वृत्त 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलं आहे.
मॅशिअस गायिका होती, तर टॅपिया गृहिणी आणि रेयना विद्यार्थिनी होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 5 एप्रिलला सर्वात आधी तिन्ही तरुणींचा छळ करण्यात आला. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आणि पुरण्यात आलं. मच्छिमारांनी पोलिसांना मृतदेहांची माहिती दिली. इस्मेरल्डास नदीजवळ एक श्वान जमिनीवर वास घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, टॅपियाने आपल्या बहिणीला एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला होता. यामध्ये तिने आपलं लाइव्ह लोकेशनही शेअर केलं होतं. 4 एप्रिलला रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी पाठवलेल्या या मेसेजमध्ये 'गरज लागेल यासाठी पाठवत आहे' असं लिहिलं होतं. याच घटनास्थळापासून जवळ या तरुणींचे मृतदेह सापडले.
स्थानिक वृत्तानुसार, रेयनाने बेपत्ता होण्याच्या काही तास आधी आपल्या मित्राला मेसेज पाठवला होता. त्यात तिने लिहिलं होतं की "मला वाटतं काहीतरी होणार आह. जर काही झालं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करते हे लक्षात ठेव".
या तिन्ही तरुणींना पुरण्यात आलं होतं. त्यांचे हात बांधण्यात आले होते आणि तोंडावर पट्टी बांधण्यात आली होती. शरिरावर छळ करण्यात आल्याच्या जखमाही दिसत आहेत. पोलीस तरुणींचे मोबाइल फोन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोबाइल फोनच्या सहाय्याने आरोपींची माहिती मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.