लंडन : जगातल्या सगळ्यात महागड्या मेंढीचा लिलाव करण्यात आला आहे. या मेंढीला ३,५०,००० गिनी (४९०,६५१ डॉलर) एवढ्या किंमतीला विकण्यात आलं आहे. भारतीय रुपयांनुसार या मेंढींची किंमत जवळपास साडेतीन कोटी रुपये एवढी आहे. मेंढीला जगात आत्तापर्यंत एवढी किंमत पहिल्यांदाच मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
टेक्सल ब्रीडची ही मेंढी गुरुवारी लानार्कमध्ये स्कॉटिश नॅशनल टेक्सल सेलमध्ये तीन शेतकऱ्यांनी विकत घेतली. टेक्सल्स ब्रीडची मेंढी जगात अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे साहजिकच या मेंढीची मागणीही जास्त असते. ही मेंढी नेदरलँडच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या टेक्सेलच्या छोट्याश्या बेटावर सापडते. या मेंढीची किंमत ही पाच अंकीच असते, पण अनेकवेळा या मेंढीला त्यापेक्षाही खूप जास्त किंमत मिळते.
टेक्सल ब्रीडची ही मेंढी विकत घेण्यासाठी ७-८ जण बोली लावत होते, त्यामुळे या मेंढीला एवढी जास्त किंमत मिळाली. याआधी २००९ साली मेंढीच्या लिलावाचं रेकॉर्ड झालं होतं. त्यावेळी मेंढीला आतापेक्षा ३५ टक्के कमी किंमतीला विकलं गेलं होतं.